-रोख मोबदल्याच्या मागणीमुळे जागा ताबे ,रस्त्यांची कामे रखडले – प्रशांत वाघमारे
–म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान तसेच बाणेर पाषाण लिंक रोड डीपी रस्त्याच्या कामातील बहुतांश अडथळे दूर….
पुणे- विविध आरक्षणातील जागामालक रोख मोबदल्याची मागणी करत असल्याने आणि मनपा कडे पुरेसा निधी नसल्याने अनेक रस्त्यांचे काम रखडले आहे.नागरिकांनी टीडीआर चा पर्याय स्वीकारल्यास विकास कामे वेगाने पूर्ण होतील.तसेच मनपा RCB आरक्षण कर्ज रोखे ( Reservation credit bond ) च्या बाबतीत ही धोरण तयार करत असून हा पर्याय सर्वमान्य होइल व त्यायोगे जागा ताबा प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येइल असे स्पष्ट करत .डी पी तील सर्व जागा ताब्यात घेण्यासाठी ५८००० कोटी रुपयांची आवश्यकता असून यात ३०% रक्कम रस्त्यांसाठी द्यावी लागेल – मात्र आरक्षण कर्ज रोखे ही सरसकट दिल्यास त्याचा मनपा च्या उतपन्नावर मोठा परिणाम होइल त्यामुळे त्याबाबतचे धोरण आखताना अनेक अंगांनी विचार करावा लागेल असे आज महापालिकेतील पुण्याचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी भाजपच्या शिष्टमंडळाशी बोलताना स्पष्ट केले .
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड मधील प्रलंबित प्रश्नां संदर्भात मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती.सर्व विषयांचा पाठपुरावा करुन निश्चित कालावधीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी समन्वयक म्हणून संदीप खर्डेकर यांना जबाबदारी देण्यात आली होती.त्या अनुषंगाने आज नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे,नगरसेविका व महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष माधुरीताई सहस्त्रबुद्धे,भाजपचे उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर,राहुल कोकाटे,अजय मारणे,शहर अभियंता प्रशांत वाघमारे,पथ विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र अर्धापुरे,श्री.गोजारी,मालमत्ता व्यवस्थापन चे उप अभियंता जे.बी.पवार,सुधीर कदम कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग ,श्री.धारव उप अभियंता,श्री.टकले उप अभियंता बांधकाम विभाग यासह विविध खात्याचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.या बैठकीत अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने आता प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील व आज बैठकीत कबूल केलेल्या कालमर्यादेत सर्व प्रश्न सुटतील अशी अपेक्षा समन्वयक संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली.आज झालेल्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले …
१) म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान ३० मीटर चा रस्ता युद्धपातळीवर पूर्ण करताना सर्व अडथळे दूर करण्यात आले असल्याने पदपथ करणे,डिव्हायडर चे काम करणे व वृक्षतोडीसह सर्व कामे उद्यापासूनच सुरु करण्यात येतील.याबाबतीत नगरसेवक जयंत भावे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी अनेक विषयांवरील चालढकली बाबत नाराजी व्यक्त केली.
२) टीडीआर च्या बदल्यात जागा ताब्याची ४ प्रकरणे दाखल असून त्या फाईली तातडीने निकाली काढण्यात येतील.
३) शाहू वसाहती शेजारील जागेपासून पंडित फार्म पर्यंतची रिटेनिंग वॉल चे काम दिवाळी नंतर सुरु करण्यात येइल.
४) ह्या रस्त्यात येणाऱ्या अतिक्रमणां वर त्वरित कारवाई केली जाईल व अडथळे दूर केले जातील.
या व्यतिरिक्त प्रल्हाद सायकर व राहुल कोकाटे यांनी पाषाण बाणेर लिंक रोडचा विषय प्रकर्षाने मांडला व तेथील जागा ताबा प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली.याबाबतीत खुलासा करताना प्रशांत वाघमारे यांनी सांगितले की जागामालक रोख मोबदल्याची मागणी करत असल्याने आणि मनपा कडे पुरेसा निधी नसल्याने अनेक रस्त्यांचे काम रखडले आहे.
प्रभाग ११ मधील प्रश्न प्रकर्षाने मांडणारे भाजपचे नेते अजय मारणे यांनी सुतारदऱ्या तील नाल्याभोवतीच्या संरक्षक भिंतीचे काम त्वरित पूर्ण करणे तसेच म्हातोबानगर मधील रस्त्याचे काम ही त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी आग्रही मागणी मांडली.दोन्ही कामे येत्या १५ दिवसांत सुरु करण्यात येतील असे श्री.प्रशांत वाघमारे यांनी स्पष्ट केले.

