पुणे :
अडचणीतून मार्ग काढून प्रगतीसाठी प्रयत्न करणार्या ‘रुपी को -ऑपरेटिव्ह’ बँकेस पुण्यातील ‘मुस्लिम को ऑपरेटिव्ह’ बँकेने व्यवस्थापन आणि कर्मचारी वर्गाच्या वतीने आज 15 संगणक भेट दिले.
मुस्लिम बँकेच्या प्रशासकीय मुख्य कार्यालयात मुस्लिम को -ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांच्या हस्ते रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित, सदस्य अच्युत हिरवे यांनी ही भेट स्वीकारली.
‘रुपी बँकेने सर्व सहकारी बँकांकडे मदत मागितली त्यातील पहिला सकारात्मक प्रतिसाद ‘मुस्लिम को -ऑपरेटिव्ह बँके’ने दिला. बँकेला संकटातून बाहेर काढायचे तर अशाच सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आम्ही ‘रुपी बँक’ वाचवू आणि अवसायनात जाऊ देणार नाही,’ असे सुधीर पंडित यांनी सांगितले.
‘रुपी बँकेला अडचणीत असताना सहकार्याचा हात पुढे करणे हे सहकार क्षेत्रातील आमचे एक कर्तव्य आहे. ‘मुस्लिम बँक’ ही रुपी बँकेला संकटातून बाहेर येण्यासाठी वसुली कार्यात सहभाग, प्रशिक्षण, आधुनिकीकरण अशा मार्गाने मदत करेल. कर्मचारी वर्गात उत्साह निर्माण करून ‘रुपी’च्या प्रशासकीय मंडळाने संकटावर मात करावी’, असे प्रतिपादन पी. ए. इनामदार यांनी केले.
‘रुपी बँकेला अत्याधुनिक संगणक आणि संगणक प्रणाली अभावी दैनंदिन कामात अडचणी येत होत्या. त्या दूर होण्यास या मदतीचा उपयोग होईल,’ असे अच्युत हिरवे यांनी सांगितले.
दीपक बिडकर यांनी प्रास्ताविक केले. इम्तियाझ शिकलगर यांनी आभार मानले. यावेळी ‘रुपी बँक’ सरव्यवस्थापक नितीन लोखंडे, उप सरव्यवस्थापक अंबाप्रसाद देशपांडे, तसेच मुस्लिम बँक उपाध्यक्ष मुमताज सय्यद, संचालक वर्ग, तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

