विविध चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच ३ राष्ट्रीय व ११ महाराष्ट्र राज्य पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या सौ. कल्पना विलास कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन्स’ निर्मित व संजय कृष्णाजी पाटील लिखित – प्रस्तुत आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ या बहुचर्चीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चीत करण्यात आली असून येत्या १७ नोव्हेंबर २०१७ रोजी हा चित्रपट मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोवा इत्यादी ठिकाणी प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटील यांनी प्रथम पदार्पणातच ३ राष्ट्रीय आणि ११ राज्य पुरस्कारांवर आपले नाव कोरून विविध आंतरराष्ट्रीय सन्मान मिळून आपली दिग्दर्शनातील चुणूक दाखून दिली आहे. तसेच दर्जेदार चित्रपट निर्मितीची कास धरून सौ. कल्पना विलास कोठारी यांनी मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. यापूर्वी त्यांनी अभिनय आणि निर्मिती करीत नाट्यसृष्टीत दर्जेदार बालनाट्यकृती आणि व्यावसायिक नाट्यनिर्मिती केली आहे. ‘दशक्रिया’ सारख्या एका अत्यंत वेगळ्या विषयावरील निर्मिती करून त्यांनी चित्रपट निर्मितीत आपले भक्कम पाय रोवले आहेत. ‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’सारख्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांनी ‘दशक्रिया’ चे पटकथा, संवाद, गीते लिहिली आहेत. दशक्रियाची कथा जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या ‘दशक्रिया’ या साहित्यकृतीवर आधारित आहे.
६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘दशक्रिया’ला सर्वोत्कृष्ठ प्रादेशिक मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ठ पटकथा (रुपांतरीत), सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता अश्या तीन सर्वोत्कृष्ठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला तब्बल ११ पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ‘कान्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ व बर्लिन येथे ‘इंडिया विक’ या विशेष विभागात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ‘दशक्रिया’ने जगभरातल्या सुजान आणि अभ्यासू रसिकांची वाहवा मिळविली आहे. तसेच भारतातील १० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबातच संस्कृती कला दर्पणचे ४ पुरस्कार, सकाळ प्रीमिअर पुरस्कारांमध्ये स्पेशल ‘सोशल इम्पॅकट’ या विशेष पुरस्काराने गौरव, निफ मध्ये १३ विभागांसाठी नामांकने तर झी चित्रगौरव मध्ये एक नामांकन आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये २ पुरस्कार अशा विविध पारितोषिकांनी‘दशक्रिया’ला गौरवण्यात आले आहे.
‘दशक्रिया’ या चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचं प्रतिबिंब दाखवीत जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू रसिकप्रेक्षकांच्या हृदयाला भिडतात. जगभरातील चित्रपट महोत्सवांद्वारे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे वेगळे दर्शन घडवण्याचे काम हा चित्रपट करीत आहे. या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, बालकलाकार आर्य आढाव, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, पंकज चेंबूरकर, मनाली सागर रायसोनी, रुचा मयुरेश शिवडे, अनुश्री फडणीस, रसिका चव्हाण, संदीप जुवाटकर, विद्यासागर अध्यापक, प्रशांत तपस्वी, अनिल राबाडे, संस्कृती रांगणेकर, राहुल शिरसाट, सोनाली मगर, उमेश बोलके, अभिजित झुंझारराव, गणेश चंदनशिवे, प्रफुल्ल घाग, मनोहर गोसावी, तृप्ती अटकेकर, विनोद दोंदे बालकलाकार विनायक घाडीगावकर, कैवल्य पिसे, आदित्य धुरी, क्षितिजा पंडित, श्रेया चौघुले, यांच्यासोबत जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून आनंदा कारेकर, जयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.
जेष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश आणे यांनी ‘दशक्रिया’चा कॅनव्हास जिवंत केला आहे. अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढविण्यात यशस्वी झाले असून स्वप्नील बांदोडकर, बालशाहिर पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर, आरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे. नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन केले आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना सौ.स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, मिलिंद जोशी यांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे.