- जास्मिन जेबवी,मिरीयम बियांका बुलगारु, इरिना क्रोमाचेव्हा, इमेली वेबली स्मिथ, लौरा पिगोस्सी यांची आगेकूच
पुणे,: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित 25 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या ऋतूजा भोसले हिच्यासह जॉर्जियाच्या जास्मिन जेबवी,रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु, रशियाच्या इरिना क्रोमाचेव्हा,ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली स्मिथ,ब्राझीलच्या लौरा पिगोस्सी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताच्या चौथ्या मानांकित ऋतुजा भोसले हिने आरती मुनियनचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. 1तास 4मिनिटे चाललेल्या सामन्यात ऋतुजाने आरतीविरुद्ध निर्विवाद वर्चस्व राखले. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे 1-1अशी बरोबरी निर्माण झाली. पण त्यानंतर ऋतुजाने आक्रमक पवित्रा स्वीकारत आरतीची तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील पिछाडीवर असलेल्या आरतीला सूर गवसला नाही. या सेटमध्येदेखील ऋतुजाने आपल्या बिनतोड सर्व्हिसेसच्या जोरावर हा सेट 6-1 अशा सारख्याच फरकाने जिंकून विजय मिळवला. यावेळी ऋतुजा म्हणाली की, याआधीही मी आरतीशी कधीही सामना खेळला नाही. पण ती एक उत्तम प्रतिस्पर्धी आहे. आरतीने सामन्यात जोरदार खेळ केला. पण मी तिला फारशी संधी दिली नाही. या स्पर्धेत अनेक मानांकित खेळाडूंचा सहभाग आहे. एमएसएलटीए व एआयटीए यांनी एकत्र येऊन भारतीय खेळाडूंसाठी हि स्पर्धा आयोजित केल्यामुळे मला आनंद होत आहे. या स्पर्धेचा आम्हांला नक्कीच फायदा होईल.
संघर्षपूर्ण लढतीत जॉर्जियाच्या जास्मिन जेबवी हिने भारताच्या जेनिफर लुईखेमचा 6-1, 5-7, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करत आगेकूच केली. हा सामना तब्बल 3तास 7 मिनिटे चालला. भारताच्या जेनिफर लुईखेमने जास्मिनला विजयासाठी चांगलेच झुंजवले. पहिल्या सेटमध्ये जास्मिनने सुरेख सुरुवात करत पाचव्या गेममध्ये जेनिफरची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये जेनिफरने जोरदार कमबॅक करत सुरुवातीलाच दुसऱ्या गेममध्ये जास्मिनची सर्व्हिस रोखली व सामन्यात आघाडी घेतली. पण त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ केला. त्यामुळे सामन्यात 5-5अशी बरोबरी निर्माण झाली. जेनिफरने 12व्या गेमला जास्मिनची सर्व्हिस भेदत हा सेट 7-5असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये जास्मिनने आपला खेळ उंचावत तिसऱ्या गेमला जेनिफरची सर्व्हिस ब्रेक केली व या सेटमध्ये जेनिफरला फारशी संधी न देता हा सेट 6-2 असा जिंकून विजय मिळवला. रशियाच्या आठव्या मानांकित इरिना क्रोमाचेव्हा हिने भारताच्या श्रीवल्ली रश्मीका भामिदीप्तीचे आव्हान 6-4, 6-4 असे संपुष्ठात आणले. सहाव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली स्मिथ हिने भारताच्या समा सात्विकाचा 6-2, 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित ब्राझीलच्या लौरा पिगोस्सी हिने भारताच्या सौम्या वीजचा 6-2, 6-0 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: पहिली(मुख्य ड्रॉ)फेरी: महिला:
इरिना क्रोमाचेव्हा(रशिया)(8)वि.वि.श्रीवल्ली रश्मीका भामिदीप्ती(भारत)6-4, 6-4;
जास्मिन जेबवी(जॉर्जिया)वि.वि.जेनिफर लुईखेम(भारत)6-1, 5-7, 6-2;
मिरीयम बियांका बुलगारु(रोमानिया)(2)वि.वि.हुमेरा बहारमुस(भारत)6-2, 6-3;
मारियाना झकारल्युक(युक्रेन)(5)वि.वि.ऍद्रीयन नागी(हंगेरी)6-4, 6-1;
ऋतुजा भोसले(भारत)(4)वि.वि.आरती मुनियन(भारत)6-1, 6-1;
पिया लोव्हरीक(स्लोव्हाकिया)वि.वि.एलेना जमशिदी(डेन्मार्क)6-0, 6-2;
इमेली वेबली स्मिथ(ग्रेट ब्रिटन)(6)वि.वि.समा सात्विका(भारत)6-2, 6-1;
लौरा पिगोस्सी(ब्राझील)(3)वि.सौम्या वीज(भारत)6-2, 6-0;
दुहेरी गट: पहिली फेरी:सौजन्या बाविशेट्टी(भारत)/प्रार्थना ठोंबरे(भारत)(3)वि.वि.स्मृति भासीन(भारत)/आकांक्षा नित्तुरे(भारत)3-6, 6-4, 13-11;जेनिफर लुईखेम(भारत)/मिहिका यादव(भारत)पुढे चाल वि.शर्मदा बाळू(भारत)/स्नेहल माने(भारत)2-1 सामना सोडून दिला;
रिया भाटिया(भारत)/मिरीयम बियांका बुलगारु (2)वि.जास्मिन जेबवी(जॉर्जिया)/मारियाना झकारल्युक(युक्रेन)4-6, 6-3, 10-6;अश्मीता इश्वरमूर्ती(भारत)/भुवना कालवा(भारत)वि.वि.लिखिता कालवा(भारत)/इमा व्हॅन पॉपेल(नेदरलँड)7-6(5), 6-4.

