लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे ‘सारस फ्ली एक्स्पो’
पुणे : “महिलांकडे ‘मल्टिटास्किंग’चे कौशल्य असते. घरचा व्याप सांभाळून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवून त्या आपल्यातील कला व व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करत असतात. अशावेळी लायन्स क्लबने या महिला व्यावसायिकांचे प्रदर्शन आयोजित करून त्यांना प्रोत्साहन व संधी दिली आहे,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या रुक्साना मेहेर अंकलेसरिया यांनी व्यक्त केले.
लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे मुकुंदनगर येथील शिवशंकर सभागृहात ‘सारस फ्ली एक्स्पो’ या महिलांनी स्वतः बनविलेल्या हस्तकला व अन्य वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन रुक्साना मेहेर अंकलेसरिया व शशिकला फत्तेचंद रांका यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी क्लबचे मार्गदर्शक फत्तेचंद रांका, क्लबचे अध्यक्ष अनिल सुगंधी, सचिव पूनम अष्टेकर, माजी अध्यक्ष दीपाली गांधी, आशा ओसवाल, सदस्या चैताली पटनी, चैताली पटवा, मनीषा शहा, उत्कर्ष गांधी, अनिकेत आघाव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनात महिलांनी बनवलेल्या वस्तू खूपच सुदंर आणि दर्जेदार आहेत. अतिशय बारकाईने आणि कलाकुसरीने या वस्तू तयार केल्या आहेत. त्यांच्यातील कलाकाराची मेहनत या वस्तूंमधून दिसत आहे, अशा शब्दांत शशिकला रांका यांनी महिलांच्या कलाकुसरीचे कौतुक केले.
समाजातील गरजू, वंचित रुग्णांना अल्प दरात डायलेसिस करता यावे, यासाठी या प्रदर्शनातून निधी संकलन केले जाते. उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून, प्रदर्शनात जवळपास १०० स्टॉल्स उभारण्यात आले असून यामध्ये घरातील सुशोभित वस्तुंपासून ते कपडे, हाताने बनविलेले कलाप्रकार, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.