पुणे-ऋषिपंचमीचा सण हा मुलींनी साजरा करण्याचा सण आहे. त्याचे औचित्य साधून आज अहिल्यादेवी शाळेमध्ये दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा पाद्यपूजन,औक्षण,तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात पहिले व्यक्तिमत्व होते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे व दुसऱ्या व्यक्ती होत्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीम. जयश्री वैद्य.डॉ . शरद कुंटे यांनी आपल्या भाषणात दीपप्रज्वलनाचे महत्त्व कथन केले तसेच विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी डॉ . कुंटे यांनी डॉक्टर .ए .पी .जे अब्दुल कलाम, कार्व्हर ,एडिसन इत्यादी वैज्ञानिकांची उदाहरणे त्यांच्या समोर ठेवली. ऋषिपंचमीनिमित्त त्यांनी आधुनिक ऋषींची व्याख्या , ज्याच्या समोर नतमस्तक व्हावेसे वाटते तो ऋषी अशी केली .
श्रीम. वैद्य यांनी विद्यार्थिनींना ऋषिपंचमीनिमित्त नमस्काराचे महत्व, संस्कारांचे महत्त्व दोन छोट्या छोट्या गोष्टींमधून कथन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीम. अनघा डांगे यांनी केले,शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती स्वाती मिश्रा यांनी आभार व्यक्त केले . सूत्रसंचालन प्रज्ञा करडखेडकर यांनी केले.प्रार्थना व संस्कृत गीत संगीत शिक्षिका श्रीम. मानसी देशपांडे , श्री दिलीप गुरव व प्रशालेतील गानवृंदाने सादर केले. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका श्रीम.चारुता प्रभुदेसाई उपस्थित होत्या .