पुणे, दि. १३ : भारतीय लष्कराचा उल्लेख ‘संरक्षण सेना’ असा न करता ‘सशस्त्र सेना’ असा करण्याची मानसिकता भारतीयांमध्ये निर्माण व्हावी, अशी अपेक्षा एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निवृत्त लष्करी अधिकार्यांचा प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात गोखले बोलत होते.
एअर मार्शल भूषण गोखले, कर्नल एम. पी. एस. मौर्य, कर्नल जे. एस. बाली, कमांडिंग ऑफिसर आर. एस. जाधव, कर्नल शैलेश विलेकर, कर्नल मोदेन नदाफ, कर्नल उदय पिसोळकर, कर्नल मलेशी कदूर, लेफ्टनंट कर्नल अनिल कुबेर, कमांडर सारंग गलांडे, कमांडर शरद देशपांडे, कमांडर विक्रम कर्वे आणि ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी यांचा सन्मानार्थींमध्ये समावेश होता.
कर्नल मोदेन नदाफ यांनी यावेळी मागदर्शन केले. डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक, श्वेता लढ्ढा यांनी सूत्रसंचालन आणि सुनील ओहाळ यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
इंग्रज गेले परंतु इंग्रजी मानसिकता मनातून दूर होणे आवश्यक आहे. आपल्या देशाचा ज्वाज्वल्य अभिमान युवकांमध्ये निर्माण झाला पाहिजे. राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी भाषा, संस्कृती, परंपरा यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात देशाचे चित्र आणि त्यामध्ये माझी भूमिका काय असेल याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले. ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे उपलब्धी आणि आव्हाने’ या विषयावर देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.