‘रेती’ सिनेमाचे ‘शान’दार संगीत लाँच
आजच्या सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक सिनेमे मराठीत दाखल होत आहे. विशेष म्हणजे वास्तववादी कथानकावर आधारित या सिनेमांना सर्वाधिक प्रसिद्धी देखील मिळत आहे. याच धाटणीचा ‘रेती’ हा मराठीतील आणखीन एक वेगळा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अवैध्य रेती उपसा प्रकरणावर सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या राजकारण उलाढालीवर आणि सामाजिक समस्येवर मार्मिक टिप्पणी करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. सुहास भोसले दिग्दर्शित या सिनेमाच्या गाण्याचे नुकतेच प्रभादेवी येथील कोहिनूर हॉटेलमध्ये म्युजिक लाँच सोहळा पार पडला. सिनेमाच्या सर्व स्टारकास्ट आणि टीम मेंबरच्या उपस्थितीत ‘रेती’ या सिनेमाच्या गाण्याचे म्युजिक लाँच करण्यात आले. देवेन कापडणीस यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून संजय कृष्णाजी पाटील यांनी या सिनेमाचे गीतलेखन केले आहे. विशेष म्हणजे हिंदीचे सुप्रसिद्ध गायक शान, रोशन बाळू आणि गौरव देश्गुप्ता या त्रीकुटांनी प्रथमच मराठीत ‘रेती’ या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमातील ‘निमूट ता-याचा भान वा-याचा’ या रोमँटिक गाण्याला शान आणि निहिरा जोशी यांचा आवाज लाभला असून, संजय कृष्णाजी पाटील लिखित ‘नाद येता वेदनेचा’ हे गाणे शान ने गायले आहे. तसेच प्रमोद गोरे यांच्या ‘बघ बघ’ या उडत्या लयीच्या गाण्याला अपेक्षा दांडेकरने आवाज दिला आहे. अथर्व मूव्हीज प्रमोद गोरे निर्मित तयार झालेल्या या चित्रपटाच चित्रीकरण नाशिकमधील सटाणा, नागपूर, देवळा या ठिकाणी करण्यात आलं आहे. तसेच डिस्ट्रीब्युटर पीवीआर पिक्चर सोबत इंटीटी वन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी सिनेमाचे वितरण केले आहे. रेती माफियांचा पर्दाफाश करणा-या या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात किशोर कदम, शशांक शेंडे, संजय खापरे, विद्याधर जोशी, गायत्री सोहम, सुहास पळशीकर, दीपक करंजीकर, मोसमी तोंडवळकर, भाग्यश्री राणे आदि कलाकार देखील आपल्या प्रमुख भूमिकेत दिसतील. हा चित्रपट गुडीपाडवाच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.