मुंबई- कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध सोमवार मध्यरात्रीपासूनच शिथिल करण्यात आले आहेत. सुधारित नियमावलीनुसार पर्यटनस्थळे, उद्याने, पार्क उघडण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिक सोहळे, कला-सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेने तर विवाह सोहळ्यास कमाल २०० जणांना उपस्थित राहण्यास मुभा असेल. तसेच अंत्यविधीसाठी उपस्थितीची मर्यादा हटवण्यात आली आहे. आठवडे बाजारासही मुभा देण्यात आली आहे.सोमवारी रात्री उशिरा मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी नवी नियमावली जारी केली. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये लसीचा पहिला डोसचे प्रमाण ९०% आणि दोन्ही डोसचे प्रमाण ७०% असेल त्या जिल्ह्यांसाठी ही नियमावली लागू असेल. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंतची संचारबंदीबाबतचा निर्णय संबंधित जिल्ह्यांमधील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोडण्यात आला आहे.
सुधारित नियमावली पुढीलप्रमाणे
पर्यटनस्थळे, नॅशनल पार्क : सर्व पर्यटनस्थळे, नॅशनल पार्क, सफारी नियमित वेळेनुसार खुल्या राहतील. तिकीट ऑनलाइन खरेदी करावे लागेल. दोन्ही डोस आवश्यक.
हे ५० टक्के क्षमतेने सुरू
धार्मिक, सांस्कृतिक :
धार्मिक सोहळे उदा.भजन-कीर्तन, करमणूक, कला- सांस्कृतिक कार्यक्रमांना हॉल, मांडवाच्या ५० टक्के क्षमतेने परवानगी. जलतरण तलाव, वॉटर पार्क, अॅम्युझमेंट व थीम पार्क रेस्टॉरंट, चित्रपट, नाट्यगृहे, ‘स्पा’ ५० टक्के क्षमतेने सुरू.
उद्याने, पार्क : शहरातील बगिचे, उद्याने, पार्क सुरू करण्यास मुभा. स्थानिक प्रशासन वेळा निश्चित करेल.
विवाह सोहळे : खुल्या जागेच्या अथवा मंगल कार्यालयात २५ % अथवा जास्तीत जास्त २००.
खेळ, स्पोर्ट्स इव्हेंट : आसन व्यवस्थेच्या २५%.





