‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या पंतप्रधानांच्या निवडक भाषणांच्या संग्रहाचे एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन
हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा ज्ञानकोश असून जटिल सामाजिक समस्यांबद्दल त्यांची सखोल जाण विशद करते : अनुराग ठाकूर
पंतप्रधानांच्या निवडक भाषणांचा संग्रह ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या पुस्तकाचे प्रकाशन आज माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रकाशन विभागाच्या संचालनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह केले. हे पुस्तक, पंतप्रधानांनी मे 2019 ते मे 2020 या काळात विविध विषयांवर केलेल्या 86 भाषणांचे संकलन आहे.
देशासमोरील आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी केले जात असलेले समन्वित प्रयत्न याविषयीचे आकलन व्यापक करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. सध्याचे सरकार ‘सर्वे जन सुखिनो भवन्तु ’ (सर्व लोक सुखी राहोत ) हे व्यापक तत्त्वज्ञान अंगीकारून काम करत असल्याचे ते म्हणाले. चांगल्या योजना याआधीही सुरू करण्यात आल्या, परंतु सर्व योजनांची निर्धारित मुदत आणि लक्ष्य यांच्या पालनात केवळ सध्याचेच पंतप्रधान अग्रणी आहेत, ते सातत्याने देखरेख आणि लोकांपर्यंत त्या परिणामकारकरित्या पोहोचतील याची काळजी घेतात. आपल्या उत्कृष्ट संभाषण कौशल्याच्या देणगीसह पंतप्रधान मोदी देशातील सर्व लोकांशी सारख्याच प्रकारे संपर्क साधू शकतात,असे कौतुक नायडू यांनी केले.

कोट्यवधी बँक खाती उघडणे अप्राप्य वाटले होते, परंतु पंतप्रधान मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली हे लक्ष्य अतिशय जलदगतीने साध्य करण्यात आले होते, याची आठवण नायडू यांनी सांगितली. थेट लाभ हस्तांतरण हे सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचे नायडू यांनी सांगितले. थेट लाभ हस्तांतरणामुळे लोक दलालांच्या कचाट्यातून मुक्त झाले आणि कल्याणकारी उपायांचे वितरण शेवटच्या स्तरापर्यंत सुनिश्चित झाले,असे ते म्हणाले. पूर्वीच्या योजना सरकारी किंवा राजकीय म्हणून ओळखल्या जात होत्या, मात्र उद्दिष्टांची पूर्तता लोकसहभागावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते, हे पंतप्रधान मोदी यांनी जाणले. यातूनच स्वच्छ भारत मोहीम पंतप्रधानांनी जनआंदोलन (लोक चळवळ) म्हणून उभी केली,असे नायडू म्हणाले.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, या पुस्तकात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे उपेक्षित वर्ग आणि महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांना वाटणारी काळजी.
पंतप्रधान मोदी यांच्या पूर्वी देशाचा विकास ही फक्त सरकार आणि नोकरशाहीची जबाबदारी होती. मात्र पंतप्रधान मोदी यांनी देशाचा विकास हा लोकभागीदारी म्हणजे प्रक्रिया आणि फलश्रुती यात देशाचे लोक समान भागीदार असतील, याची सुनिश्चिती केली आणि यातूनच खरी लोकशाहीची संकल्पना साकार झाली,असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुस्तकाविषयी सांगितले, या पुस्तकात 10 प्रकरणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 86 भाषणे संकलित करण्यात आली आहेत आणि गुंतागुंतीच्या सामाजिक समस्यांबद्दलची त्यांची सखोल जाण आणि त्यांची स्पष्ट दृष्टी स्पष्ट करते. हे संकलन भविष्यातील इतिहासकारांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या भाषणांमधून, गुंतागुंतीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांचे विचार आणि त्यांचे नेतृत्व, ज्याची परिणती भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात झाली आहे, ते समजून घेता येऊ शकेल , असे ठाकूर म्हणाले. त्यांच्या तळमळीसोबतच दलालांना वगळत शेवटच्या स्तरापर्यंत सेवा देण्याची आणि सुनिश्चित करण्याची त्याची तळमळ आणि त्यासोबत कृती यामुळेच लोकांना त्यांच्याविषयी अतूट विश्वास वाटतो, असे प्रतिपादन ठाकूर यांनी केले.
सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या विलक्षण क्षमतेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत ठाकूर म्हणाले की, विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत, शेतकर्यांपासून ते सीमेवरील सैनिकांपर्यंत, खेळाडूंपासून ते व्यावसायिकांपर्यंत,जे पंतप्रधानांचे भाषण ऐकतात ते समरस होतात आणि विविध आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांनी पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे. प्रमुख जागतिक नेत्यांनी नरेंद्र मोदी म्हणजे काय याचे विस्तृत विवेचन केले आहे.
या पुस्तकात परराष्ट्र संबंधांवरील त्यांची भाषणे, अर्थव्यवस्थेबद्दलचे त्यांचे विचार आणि काशी विश्वनाथ धाम, केदारनाथ धाम, अयोध्या, देवघर सारखा सांस्कृतिक वारसा जपण्याबाबतचे त्यांचे विचार आहेत. हे पुस्तक वाचकांना भारताचे पर्यावरण आणि हरित भारत निर्माण करण्यासाठी उचललेली पावले, विविध मंत्रालयांची कामगिरी , तंदुरुस्ती , योग आणि क्रीडा यांना मुख्य प्रवाहात आणणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय, रोजगार, ग्रामोदय ते राष्ट्रोदय या क्षेत्रातील सरकारची कामगिरी , स्वयंपूर्ण बनण्याचा भारताचा प्रवास याबाबत त्यांच्या कल्पनांची माहिती देईल असे ते म्हणाले.
हे पुस्तक म्हणजे विविध सरकारी योजनांबाबत नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा विश्वकोश आहे. या संकलनात, वाचकांना ऐतिहासिक प्रसंगी केलेली भाषणे देखील आढळून येतील – उदा. राज्यसभेचे 250 वे सत्र , असोचॅमला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केलेले भाषण , 8 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवल्यानंतरचे , 19 मार्च 2020 रोजी कोविड संदर्भात राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण , दिलेला संदेश, फिट इंडिया चळवळीच्या उदघाटन प्रसंगी केलेले भाषण , अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी राष्ट्राला दिलेला संदेश इ.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, या पुस्तकात विविध राजकीय नेत्यांच्या नकारात्मक भविष्यवाणीला दिलेला प्रतिसाद आहे. या राजकीय नेत्यांनी म्हटले होते की कलम 370 रद्द केल्यानंतर भारत तग धरू शकणार नाही, काश्मीरमध्ये एकही व्यक्ती भारतीय तिरंगा फडकवणार नाही. मात्र आज हर घर तिरंगा अभियानाला देशाच्या इतर भागांप्रमाणेच काश्मीरमध्येही तितकेच यश मिळाले आहे आणि काश्मीरमध्ये यापूर्वी कधीही झाला नाही असा विकास आता होत आहे.
यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा, प्रकाशन विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी आणि मंत्रालयाच्या विविध माध्यम विभागांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या पुस्तकाबद्दल
हे पुस्तक पंतप्रधानांच्या मे 2019 ते मे 2020 पर्यंतच्या विविध विषयांवरील 86 भाषणांवर केंद्रित आहे. संकल्पनेनुसार दहा भागात विभागलेली ही भाषणे नवभारताबाबत पंतप्रधानांची दूरदृष्टी प्रतिबिंबित करतात. नियोजनपूर्वक विभाग केले आहेत – आत्मनिर्भर भारत: अर्थव्यवस्था, जनता -प्रथम शासन, कोविड-19 विरुद्ध लढा, उदयोन्मुख भारत: परराष्ट्र व्यवहार, जय किसान, टेक इंडिया-न्यू इंडिया, हरित भारत-लवचिक भारत-स्वच्छ भारत, फिट इंडिया- कार्यक्षम भारत, शाश्वत भारत-आधुनिक भारत: सांस्कृतिक वारसा आणि मन की बात.
या पुस्तकात पंतप्रधानांच्या नव- भारताबाबत कल्पनेचे चित्रण केले आहे, जो स्वावलंबी, लवचिक आणि आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करण्यास सक्षम आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वगुण, दूरदर्शी विचारसरणी आणि दूरदृष्टीला त्यांच्या असाधारण वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून सामान्य माणसांशी जोडले जाण्यासाठी उत्कृष्ट संवाद क्षमतेची जोड लाभली आहे. या पुस्तकातही त्याचाच प्रत्यय येतो.
इंग्रजी तसेच हिंदी पुस्तके प्रकाशन विभागाच्या विक्री केंद्रात आणि सूचना भवन, सीजीओ संकुल , नवी दिल्ली येथील बुक्स गॅलरीत उपलब्ध आहेत. प्रकाशन विभागाचे संकेतस्थळ तसेच भारतकोश प्लॅटफॉर्मवरूनही ते ऑनलाइन खरेदी करता येईल. अमेझॉन आणि गुगल प्लेवर देखील ई-पुस्तके उपलब्ध आहेत.

