पुणे-खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील रस्ता पाण्याखाली गेला असतानाही त्यात मोटार घालण्याचा आतताईपणा ५ जणांच्या अंगाशी आला होता.पाण्याच्या जोराबरोबर वाहत जाणार्या गाडीतील ५ जणांची अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांची सुटका करुन जीव वाचविला. हा प्रकार एस एम जोशी पुलाखालील नदीपात्रातील रस्त्यावर मध्यरात्री पावणे दोन वाजता घडला. वंचिका लालवाणी(वय १३), प्रिया लालवाणी(वय २२), कुणाल लालवाणी (वय २८), कपिल लालवाणी(वय २१), कृष्णा लालवाणी(वय ८, सर्व रा. पालघर) अशी सुटका केलेल्यांची नावे आहेत.
हे सर्व जण मुळचे पालघरचे राहणारे असून पुण्यातील नातेवाईकांकडे आले होते.ते राजपूत विटभट्टीकडून नदीपात्रातील रस्त्याला आले. रस्त्यावर पाणी असतानाही त्यांनी कार पाण्यात घातली.रात्रीची वेळ असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांची गाडी वाहून जात पुलाखाली अडकली होती.मध्यरात्री १ वाजून ४६ मिनिटांनी अग्निशामक दलाला एस एम जोशी पुलाखालील नदीपात्रात एक मोटार वाहून जात असल्याची खबर मिळाली.एरंडवणा केंद्राची मदत तातडीने तेथे पोहचविण्यात आली.जवानांनी रोप, लाईफ जॅकेटच्या सहाय्याने नदी पात्रात उतरून टाटा टिंगोरो या गाडीजवळ पोहचले.गाडीमध्ये भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या पाच जणांना सुखरुप बाहेर काढले.अग्निशामक दलाचे चालक ज्ञानेश्वर खेडेकर , फायरमन किशोर बने ,दिलीप घडशी, संदीप कार्ले यांनी ही कामगिरी केली.