पुणे. – यावर्षीच्या मार्केटची परिस्थिती पाहता रिअल ईस्टेट क्षेत्रातील मंदीचा काळ संपून तेजी आल्याचे दिसत आहे. ही तेजी आणखी काही दिवस अशीच राहील असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तापासूनच घर खरेदीला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे विकसकांनमध्येही उत्साहाच वातावरण दिसून येतयं. सणासुदीचा हंगामात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसकही सरसावले आहेत.
रिअल ईस्टेट क्षेत्रातील तेजीविषयी बोलताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, घरांच्या किमती आता कमी होणार नसून स्थिर राहणार आहेत. ग्राहकालाही याची कल्पना असल्यामुळे ते आता किमती कमी होण्याची वाट न बघता घर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. मागील तीन वर्षांपेक्षा या वर्षीचा हा सर्वात चांगला ‘फेस्टीव सीझन’ असेल. परिणामी ग्राहकांच्या चौकशीचे प्रमाणही वाढत आहे. ग्राहक या सणासुदीच्या काळात नक्कीच घर खरेदीचा निर्णय घेतील. सुट्टीच्या दिवशी बांधकाम प्रकल्पाला भेट देण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. गृह प्रदर्शनालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. मला खात्री आहे की रिअल ईस्टेट मार्केटसाठी या वर्षीच्या सणाचा काळ सर्वोत्कृष्ट असेल.
उत्सवाच्या काळात लोकांमध्ये उत्साहांच वातावरण असतं. हा उत्साह त्यांच्या घर खरेदीमध्येही दिसून येतो. या काळात घर खरेदीकरून ते या क्षणाला अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतात. उत्सवाच्या काळात बांधकाम व्यावसायिक पण नवनवीन योजना आणि सवलती ग्राहकांना देत असतो त्यामुळे खरेदीत तेजी दिसते. परंतु सवलतींवर भाळून न जाता ग्राहकांनी कायदेशीर बाजूही तपासून पहायला हव्यात आणि सर्व पैलु लक्षात घेऊन, प्रकल्पाची चौकशी करून खरेदीचा निर्णय घ्यावा, असे मत गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल यांनी व्यक्त केले.
यावर्षीच्या ‘फेस्टीव’ ‘ट्रेन्ड’मध्ये १ व २ बीएचके फ्लॅट सोबतच ३ आणि ४ बीएचके फ्लॅटला ही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. शहराची वाढ बघता उपनगरातही घर खरेदीचे प्रमाण वाढताना दिसतेय. असेही गोयल म्हणाले.
ग्राहकांमधील खरेदीचा उत्साह बघून विकसक जुन्या प्रकल्पांसोबतच नवीन प्रकल्पही ‘लाँच’ करत आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसकांनी बँके कडून त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे, पार्किंगसाठी जागा, गृहसजावट यांसारख्या विविध योजनांही आणल्या आहेत. यावर्षीची परिस्थिती पाहता या मुहूर्ताचा फायदा ग्राहकांसोबत विकसकांनाही निश्चित होणार असे दिसून येते.

