पुणे- संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि प्रसिद्ध साहित्यिक रा. चिं. ढेरे यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.काही दिवसांपासून ढेरे यांची प्रकृती ठीक नव्हती. आज राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय इतिहास, लोकसाहित्यासोबत प्राच्यविद्या संशोधनात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. या विषयांवर विपुल लेखन करीत त्यांनी साहित्यात मोलाची भर घातली. आज त्यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यापूर्वी 11.30 वाजता त्यांचे पार्थिव साहित्य परिषदेमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर या त्यांच्या कन्या आहेत.
दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, दत्त संप्रदायाचा इतिहास, करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी, लोकदैवतांचे विश्व, लोकसंस्कृतीचे उपासक, मुसलमान मराठी संतकवी ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत . त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने केवळ संत साहित्याचेच नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्य विश्वाचे नुकसान झाले आहे, असे स्वा. रा. ती. विद्यापीठातील मराठीचे संशोधक विनायक येवले यांनी म्हटले आहे.

