रात्रीची वेळ वैऱ्याची असते असं आपल्या घरातील बडे-बुजुर्ग नेहमीच सांगतात.. दिवसा राहणाऱ्या घराच्या अंगणात मुक्तपणे खेळणारे आपण अनेकजण रात्रीच्या अंधारात बाहेर पडायलाही घाबरतो.. ही भीती बाहेरच्या अंधारात असते की मनातल्या अंधारात ? हे रात्रीचे खेळ असतात की मनाचे? हे प्रश्न आपल्याला कायम पडतात… असेच काही उत्सुकतापूर्ण प्रश्न घेऊन ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका झी मराठीवर सुरु झाली आणि पहिल्या भागापासूनच या मालिकेने अवघा महाराष्ट्र व्यापला. आज या मालिकेने आपल्या भागांची शंभरीही यशस्वीपणे पार पाडलीये. या मालिकेचं हेच यश साजरं करण्यासाठी झी मराठीच्या वतीने नुकत्याच एका शानदार कार्यक्रमाचं आय़ोजन करण्यात आलं होतं. यावेळी मालिकेतील सर्व मुख्य कलाकारांसह निर्माते संतोष अयाचित आणि सुनिल भोसले, दिग्दर्शक राजू सावंत आणि झी मराठीचे बिझनेस हेड निलेश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना निलेश मयेकर म्हणाले की, “आजच्या डेली सोपच्या युगात एखाद्या मालिकेने शंभर भाग पूर्ण करणे ही गोष्ट तशी सहज वाटत असली तरी या मालिकेच्या बाबतीत ही बाब एवढी सहज नव्हती. कारण यातील जवळपास प्रत्येक कलाकार नविन होता तसेच चित्रीकरण स्थळ मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर होतं. यात सर्वात मोठं आव्हान होतं ते कोकणात उन्हाळ्यातील दमट वातावरणातील चित्रीकरणाचं. पण हे आव्हान केवळ निर्माता दिग्दर्शकच नाही तर सर्वच टीमने स्वीकारलं. माझ्या टीमवर आणि निर्माते तसेच कलाकारांवर माझा पूर्ण विश्वास होता त्यांच्या मेहनतीनेमुळेच मालिकेला हे यश मिळालं आहे.” यावेळी मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचा मानपत्र देऊन गौरवही करण्यात आला.
काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेतून कोकणातील एका झपाटलेल्या घराची काल्पनिक कथा प्रेक्षकांना माहित झाली पण वास्तवात झपाटलेपण काय असतं ते या टीमकडे बघुन कळतं. कारण सलग ४० ते ५० दिवस चित्रीकरण तेही दिड दिड शिफ्टमध्ये काम या कलाकारांनी आणि सर्वच तंत्रज्ञांच्या टीमने केलं. घरापासून दूर असलो तरी सेटवर आमचं एक कुटुंबच तयार झालं होतं असं मनोगत प्रत्येक कलाकाराने यावेळी व्यक्त केलं. या मालिकेमुळे आम्हाला ओळख मिळाल्याचंही कलाकारांनी सांगितलं. आज या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय झालं आहे. मग तो घरासाठी झटणारा दत्ता असो की देविकाच्या प्रेमासाठी झटणारा अभिराम.. भूता खेतांना न घाबरणारी, विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवणारी निलिमा असो की भावांचं म्हणणं ऐकावं की बायकोचं या द्विधा मनस्थितीत सापडलेला माधव.. आपल्या नजरेत अनेक गूढ़ गोष्टी लपवणाऱ्या सुषमा आणि छाया असो की निरागस वाटणारी पूर्वा, आर्चीस आणि गणेश ही तिन्ही मुले. या सर्वांत आपल्या वेगळ्या शैलीने लोकांच्या मनात घर केलं ते सरीता आणि खुळो पांडूने. यांच्या सोबतीला गुरव काका, वकील, नाथा त्याची बायको अशी सर्वच छोटी मोठी पात्रे आज प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनलेली आहेत. एवढंच नव्हे तर हे चित्रीकरण जिथे होतं त्या आकेरी गावाला आणि चित्रीकरण स्थळाला रोज शेकडो लोक भेट देत आहेत. अनेक लोक सेटवर जाऊन कलाकारांना आपल्या प्रतिक्रीया देत आहेत हे विशेष. लवकरच या मालिकेत काही नवीन पात्रे बघायला मिळणार असून मालिका एका रंजक वळणावर येणार असल्याची माहितीही यावेळी निर्माते आणि दिग्दर्शकांनी दिली.