‘गदिमा हे मराठी प्रतिभेचे उत्तुंग कैलास लेणे’ – मधू पोतदार
‘रसिक मित्र मंडळ’ आयोजित ‘एक कवी – एक भाषा’ व्याख्यानमालेत प्रतिपादन
पुणे :
‘कवितेतून समरगीतांपर्यंत आणि गीतरामायणापासून चित्रपटगीतांपर्यंत आवाका असलेले ग. दि. माडगूळकर हे प्रतिभेचे उत्तुंग कैलास लेणे होते’, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक मधू पोतदार यांनी केले.
‘रसिक मित्र मंडळ’ आयोजित ‘एक कवी-एक भाषा’ व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्यासपीठावर ‘रसिक मित्र मंडळा’चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला, श्रीधर माडगूळकर, प्रदीप निफाडकर, प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख हे होते.
मधू पोतदार म्हणाले,‘ग. दि. माडगूळकर यांच्या विविधांगी लेखनप्रकारांनी महाराष्ट्रावर गारूड केले. मराठी शारदेच्या दारात त्यांनी घातलेल्या अद्भूत शब्द रांगोळीमुळे त्यांना ‘आधुनिक वाल्मिकी’ ही पदवी मिळाली.’
ग. दि. माडगूळकर यांनी कविता, नृत्यनाटिका, समरगीते, चित्रपटगीते, लावण्या असे विविधांगी लेखन केले. त्यांचे अभंगही लोकांना तुकारामांसारखे वाटत. म्हणूनच पु. ल. देशपांडे म्हणत की, गदिमा हे महाराष्ट्रात पुरणपोळीप्रमाणे लोकप्रिय आहेत.’
मराठी लावणीला गदिमा अण्णांच्या कुलीन, संस्कारी लेखणीने सभ्य स्वरूप दिले. बीभत्सपणातून बाहेर काढले हे मोठे उपकार मानावे लागतील. चित्रपटगीतातूनही निर्मात्यांना गदिमा प्राजक्ताच्या झाडाप्रमाणे भरभरून देत.
सुरेशचंद्र सुरतवाला यांनी व्याख्यानमालेच्या चार वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. श्रीधर माडगूळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले.
पुणे पत्रकार संघ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांची चांगली उपस्थिती होती.