पुणे : गगन सदन तेजोमय, सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी, अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू अशा सुमधुर गीतांच्या माध्यमातून रसिकांचे मंत्रमुग्ध करित प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांनी सादर केलेल्या भक्ती आणि भाव संगीताने संगीत सभा रंगली. निमित्त होते श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३२ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभा या कार्यक्रमाचे. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे.
गायिका राधा मंगेशकर यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून ते ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके, ना. धो. महानोर, सुरेश भट यांसारख्या महान साहित्यिकांच्या कविता आणि गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यश भंडारे यांनी सिंथेसायझर वर तर अपूर्व द्रविड यांनी तबल्यावर त्यांना साथ दिली.
ईश्वराचे निर्गुण-निराकार वर्णन करणार गगन सदन तेजोमय या गीताने राधा मंगेशकर यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराज यांचे विठ्ठलाचे वर्णन करणारे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे गीत सादर केले. भक्ती गीत सोबतच राधा मंगेशकर यांनी अविस्मरणीय भाव गीतेही सादर केली. उषा मंगेशकर यांचे पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातील काय बाई सांगू कसं गं सांगू, शांता शेळके लिखित ही वाट दूर जाते स्वप्नामधील गाणे, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, निसर्गाचे वर्णन करणारे ना.धो. महानोर यांचे असा बेभान हा वारा नदीला पूर आलेला, सुरेश भट यांची केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, आणि चांदण्यात फिरताना माझा धरलास हात या गझलांनी राधा मंगेशकर यांनी रसिकांना स्वरमयी सफर घडवली. कार्यक्रमाच्या दरम्यान राधा मंगेशकर यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
दिनांक २ ते १५ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. डॉ.योगेश गोडबोले, डॉ.सागर देशपांडे, दत्तात्रेय धाईंजे, पद्मश्री पोपटराव पवार, श्रीनिवास पेंडसे, प्रा.मुक्ता गरसोळे- कुलकर्णी, डॉ. दत्तात्रेय तापकीर, डॉ अविनाश भोंडवे, डॉ. चंद्रशेखर टिळक, चंद्रकांत शहासने, विद्या लव्हेकर, सचिन पवार, आदित्य अभ्यंकर, डॉ. रवींद्र भोळे आदी मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
भक्ती संगीताने रंगली संगीत सभा-सद्गुरु श्री जंगली महाराज १३२ व्या पुण्यतिथी उत्सवात राधा मंगेशकर यांचे गायन – श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजन
Date:

