पुणे : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे नारायण राणे यांना सत्तेची मस्ती आली आहे, जनताच ती बरोबर ऊतरवेल अशी टीका करत मंडईत आज महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या वतीने नारायण राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पालिकेतील गटनेते आबा बागूल,शिवसेनेचे संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली टिळक पुतळ्याजवळ एकत्र येत तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राणे तसेच भाजपाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना कॉंग्रेसचे रमेश बागवे यांनी भाजपा ही चुकीची संस्कृती आणत आहे असे सांगितले तर राष्ट्रवादीचे जगताप म्हणाले की राणे यांची जीभ घसरली, त्यांना भाजपाच बळ देत आहे. भाजपालाही याची किंमत चुकवावी लागेल. मोरे यांनी राणे व त्यांच्या मुलांना जनतेने पराभवाचा धडा शिकवला, पण त्यांना तो समजला नाही अशी टीका करत राणे यांचा निषेध केला.
राणे व भाजपाच्या नावाने वेगवेगळ्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.अंकुश काकडे,संजय मोरे,शाम देशपांडे,पृथ्वीराज सुतार यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी एकत्र आल्याने मंडईत गर्दी झाली होती.

