मुंबई-वांद्रे कोर्टाने आज नवनीत आणि रवी राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर खार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर राणा दाम्पत्याकडून वकिल रिझवान मर्चंट यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली. मात्र, त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास वांद्रे कोर्टाने नकार दिला.
पुढील सुनावणी 29 एप्रिलला
वांद्रे सुटीच्या न्यायालयात आज याप्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनाच्या याचिकेवर वांद्रे कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सरकारी पक्षाला 27 एप्रिलला जामिनाच्या याचिकेवर लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. तर, 29 एप्रिलला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात राणा दाम्पत्याच्या जामिनावर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता वांद्रे दंडाधिकारी या नियमित न्यायालयाकडून जामिनावर निकाल दिला जाणार आहे. तोपर्यंत राणे दाम्पत्याला कोठडीतच रहावे लागणार आहे. दरम्यान, उद्या सोमवारी तातडीच्या जामिनासाठी राणे दाम्पत्याला उच्च न्यायालयातही धाव घेता येऊ शकते .
राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा
राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचे आज सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. मुख्यमंत्री व राज्य सरकारला आव्हान देत राणा दाम्प्त्याने सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आज सुनावणीदरम्यान सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला. तर, राणांविरोधात दाखल केलेला गुन्हाच चुकीचा आहे. राणा दाम्पत्याने कोणत्याही प्रकारे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. अटकेपुर्वी त्यांना पोलिसांनी कोणतीही नोटीसदेखील दिली नाही. त्यामुळे राणा दाम्पत्याला कोणतीही कोठडी न देता त्यांना जामिन द्यावा, अशी मागणी राणा दाम्पत्याचे वकिल रिझवान मर्चंट यांनी केली. मात्र, त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.
रवी राणा तळोजा, तर नवनीत राणा भायखळ्याच्या कारागृहात?
वांद्रे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर रवी राणा यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात येईल, अशी शक्यता आहे. तर खासदार नवनीत राणा यांना भायखळ्याच्या महिला कारागृहात पाठवण्यात येईल, अशी शक्यता आहे. दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील 5 दिवस दोघांचा मुक्काम या कोठड्यांमध्येच राहणार आहे.

