कोल्हापूर – भाजपसोबत सत्तेत बसायचं… कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता दयायची…आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा…अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे…त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही तशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याची घणाघाती टिका माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नेसरी येथील जाहीर सभेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नेसरी येथील जाहीर सभेने झाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सभेलाही अलोट गर्दी लोटली. या सभेत अजित दादांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या दुतोंडी शिवसेनेवर जोरदार टिका केली. दादांनी आपल्या भाषणामध्ये साडेतीन वर्ष खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपला साथ देणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.
साडेतीन वर्ष भाजप आणि शिवसेना यांचा भोंगळ कारभार सुरु आहे. भाजप आणि शिवसेना ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेनेला शेतीतलं काय कळतं…या शिवसेनेचे नेते मुंबईत राहतात…त्यांच्या नेत्यांची एक गुंठेही शेती नाही त्यांना शेती काय कळणार अशी खरमरीत टिका अजितदादांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
हे सरकार शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे असते तर हे सरकार शेतकऱ्यांसोबत असे वागले नसते.या सरकारची इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघू शकतो परंतु या सरकारची काही करण्याची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप अजितदादांनी केला.
लोकसभा-विधानसभा काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून द्या…नाही तुमचे प्रश्न सोडवले तर पवारांची अवलाद सांगणार नाही अशी जबरदस्त इच्छाशक्ती अजितदादांनी व्यक्त केली.
नशीब १६ व्या शतकात संघ नव्हता नाहीतर शिवाजीराजांनाही संघाचे असल्याचे यांनी म्हटले असते- धनंजय मुंडे
शहीद राजगुरु हे संघाचे होते अशी चर्चा हे भाजपवाले करु लागले आहेत.स्वातंत्र्यलढयात संघ नव्हता.परंतु ज्यांनी स्वातंत्र्यलढयात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना संघाचे असल्याचे सांगण्याचे धाडस हे भाजपवाले करत आहेत.नशीब हा संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते असे म्हणायला कमी केले नसते अशी जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरीच्या जाहीर सभेत संघपरिवारावर केली.
अरे किती महापुरुषांचा अपमान कराल.किती दिवस सहन करायचा महापुरुषांचा अपमान…त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
सत्तेत असलेल्या भाजपवाल्यांची ट्रिपल तलाक,सबसिडी यावर चर्चा करतात परंतु या देशातील सर्वसामान्य जनतेला दिलेल्या विषयांवर कधी चर्चा करणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.
इतिहास घडवलेल्या मातीत मी पहिल्यांदा आलो आहे. या मातीत लढाईचे स्फुरण आहे. १६ व्या शतकात नेसरीने जो इतिहास घडवला तोच परिवर्तनाचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या हल्लाबोलच्या माध्यमातून घडवल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
राज्यातील सरकार सर्व आघाडयांवर नापास झाले आहे- जयंत पाटील
राज्यातील सरकार सर्व आघाडयांवर नापास झाले आहे. पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन देणारे सरकार पारदर्शक कारभार करत असल्याचे धाडस करताना दिसत नाही असा आरोप विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केला.
फडणवीस सरकारने साडेतीन वर्षात दोन हजाराच्यावर घोषणा आणि आश्वासने दिली आहेत. घोषणा करणे व काम करणे यामध्ये सरकारच्या कामात खूप फरक आहे आहे असेही जयंत पाटील म्हणाले. त्यांनी आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहणाऱ्या जनतेचे आभारही मानले.
सभेत आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर,आमदार हसन मुश्रीफ यांनीही आपले विचार मांडले. सभेनंतर सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाचे दर्शन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,जयंत पाटील,दिलीप वळसेपाटील यांनी घेतले.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, आमदार श्रीमती संध्या कुपेकर, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मंदा बाभुळकर आदींसह चंदगड, आजरा, गडहिग्लज यातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.