ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित अ. ब. क या बहुचर्चित चित्रपटातील स्फुर्ती गीताचा लोकार्पण सोहळा नुकताच बेंगलोर येथे ‘आर्ट ऑफ लिविंग’चे सर्वेसर्वा गुरुदेव श्री. श्री. रविशंकर यांच्या शुभहस्ते पार पडला. या सोहळ्यास पॉन्डिचेरीच्या राज्यपाल मा. किरण बेदी व मा. अमृता देवेंद्र फडणवीस उपस्थित होत्या.
महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून प्रत्येक भारतीयाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमाचा एक भाग बनला पाहिजे. मुलगा आणि मुलगी असा भेद विसरून आपण मुलींच्या विकासासाठी कटीबद्द झालो पाहिजे; असे मत श्री. श्री. रविशंकर यांनी व्यक्त केले. चित्रपट निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी चित्रपटासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा विषय निवडला त्याबद्दल श्री. श्रीनीं त्यांचे विशेष कौतुक केले
राज्यपाल किरण बेदी आपल्या भाषणात म्हणाल्या, की एक कर्तृत्ववान महिलाच कर्तुत्वान पुरुषाला जन्म देवू शकते. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने महिलांच्या विकासाचा आणि तीच्या प्रगतीचा ध्यास घ्याला हवा. मुलगी शिकली प्रगती झाली एवढे म्हणून चालणार नाही तर मुलींच्या शिक्षणासाठी सर्वांनी हातभार लावायला हवा. त्याच बरोबर या प्रसंगी अमृता देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आज मुलींचा टक्का कमी होत चालला असून ही चिंतेची बाब आहे. अ.ब.क सारख्या चित्रपटातून प्रबोधन झाल्यास महिला सबलीकरणास चालना मिळू शकेल.
‘पेटून उठू दे आज एक ज्वाला’ हे अश्विनी शेंडे यांचे मराठी तर ‘बंद थे जो बंद थे, जो मुझमें सारे, खुल गये हैं’ हे शामराज दत्ता यांचे हिंदी गीत प्रसिद्ध संगीतकार बापी – टूटूल यांनी संगीतबद्ध केले आहे. आणि दोन्ही गीतांचे पार्श्वगायन अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
श्री. श्री. रविशंकर यांच्या आश्रमातील प्रचंड जनसमुदायाच्या समवेत अ.ब.क चित्रपटातील स्फुर्ती गीताचा सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील नायक लायन फेम सनी पवार, साहिल जोशी, आर्या घारे, दीपाली बोरकर या कलावंतास निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी, दिग्दर्शक – रामकुमार गोरखनाथ शेडगे, लेखक – आबा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.