स्व.नारायणराव डांगे स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर , डॉ. पी. विठ्ठल, डॉ. सरोज पगारे, प्रा. ज्योती पंडित यंदाचे मानकरी
औरंगाबाद- स्व. नारायणराव डांगे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिवर्षी पुरस्कार देण्यात येतात. २०१९ या वर्षीच्या साहित्य पुरस्कारांसाठी डॉ. पी. विठ्ठल, डॉ. सरोज पगारे, प्रा. ज्योती पंडित यांची निवड करण्यात आली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक डांगे जाहीर केले.
सुप्रसिद्ध कवी, लेखक,समीक्षक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विषयाचे प्राध्यापक पी. विठ्ठल यांना स्व.नारायणराव डांगे साहित्य प्रभा पुरस्कार, डॉ. सरोज पगारे ह्यांना ‘फकिरा’ कादंबरीच्या हिंदी अनुवादित आवृत्तीसाठी स्व. नारायणराव डांगे स्मृती स्त्री लेखिका पुरस्कार आणि परभणी येथील प्रा. ज्योती पंडित ह्यांच्या “आणि माझा बुद्ध बोलला” ह्या महाकाव्यासाठी स्व. नारायणराव डांगे स्मृती स्त्री लेखिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक तथा समीक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, जेष्ठ कथालेखक उत्तम बावस्कर, प्रसिद्ध कवी व कादंबरीकार प्रा. डॉ. दैवत सावंत, डॉ. रमेश रावळकर, जेष्ठ साहित्यिका प्रा. ललिता गादगे, कवयित्री अशा डांगे ह्यांचा समावेश होता.
पुरस्कार वितरण रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमानंतर निमंत्रित कवींचे बहारदार कवी संमेलन होईल, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक डांगे यांनी सांगितले.