मुंबई-महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे.विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे.
राजन साळवी यांना नुकतंच शिवसेनेचं उपनेतेपद दिलेलं आहे. या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात गेले असताना राजन साळवी हे निष्ठावान म्हणून शिवसेनेतच राहिले. यामुळंच त्यांना ही संधी मिळाल्याचं बोललं जात आहे. साळवी यांचा अर्ज भरतेवेळी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील प्रभू हे उपस्थित होते.
साळवी- हे 2009 पासून सलग तीन वेळा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.,शिवसेनेचे उपनेते आहेत.
भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकरहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई आहेत .शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली .तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य आहेत ,2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला ,2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार झालेत .
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील नाराज आमदारांना सोबत घेत पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आणि भाजपच्या मदतीने थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं. पक्षातील नेत्यानेच घात केल्याने उद्धव ठाकरे दुखावले गेले असून त्यांनी या बंडखोर गटाला धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध न होऊ देता शिवसेनेनं राजन साळवी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

