पुणे: नीट परीक्षेत परराज्यातील मुलांना प्राधान्य दिले जात असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘नीट परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. या परीक्षेसाठी बाहेरून पोरं भरली तर आमची त्यावर बारीक नजर असेल, हे राज्यसरकारनं लक्षात ठेवावं, सरकारला ही धमकी वाटत असेल तर धमकी समजा. पण नीटमध्ये महाराष्ट्रातील मुलांनाच पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे पुण्यात आले होते. यावेळी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. ‘दरवर्षी नीटची समस्या उद्भवते. प्रत्येक वेळी विद्यार्थी-पालक मला भेटतात. तक्रारी मांडतात. दरवेळी आंदोलने करून, इशारे देऊन आणि सरकारशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा लागतो. हे किती काळ चालणार? किती वर्ष हा प्रकार चालणार? सरकार हा प्रश्न कायमचा का सोडवत नाही?’ असे सवाल करतानाच बाहेरच्या राज्यातील मुलांना नीट परीक्षेत भरती करायचे असल्यानेच सरकार हा प्रश्न सोडवत नसल्याचा गंभीर आरोप राज यांनी केला.
कायद्याची चौकट निर्माण करा
नीट परीक्षेसाठी सरकारचा नियम आहे. विद्यार्थी दहावी- बारावी उत्तीर्ण असावा. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, असे ते नियम आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूतही हे नियम आहेत. पण तिथे कधी असल्या समस्या उद्भवत नाही. कारण तिथल्या सरकारांनी या नियमांना कायद्याची चौकट निर्माण केली आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला कायद्याची चौकट निर्माण केली नाही. त्यामुळे हा प्रश्न कोर्टात गेला. कोर्टाने त्याला स्थगिती दिलीय. मुळात राज्यसरकारने या नियमांना कायद्याची चौकट दिली असती तर कोर्टात ही केस उभी राहिलीच नसती. सरकार काही करत नसल्यानेच हा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगतानाच या नियमांना कायद्याचं कवच देण्याची मागणी त्यांनी केली. जन्माचे दाखले असताना महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मुलांना डोमिसाईल प्रमाणपत्रं कसले मागता? असा खरमरीत सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न देणाऱ्या खासदार आणि आमदारांवरही ताशेरे ओढले.
याद राखा, सत्ता बदलत असते
मुंबईतील खड्ड्यांवरून आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला होता. त्यावरही राज यांनी जोरदार टीका केली. मिश्रा, शर्मा नावाचे पोलीस अधिकारी महाराष्ट्रातील पोरांना थर्ड डिग्री देतात. केवळ खड्ड्यांसाठी आंदोलन केलं म्हणून त्यांना फोडून काढतात. या पोलिसांविरोधात केसेस टाकणार असल्याचं सांगतानाच आज तुम्ही सत्तेत आहात. उद्या विरोधात असाल. सत्ता सतत बदलत असते. उद्या तुमच्या लोकांना फोडून काढले तर चालेल का? असा इशाराही त्यांनी दिला.
अमूलसारख्यांना महाराष्ट्रात घुसवण्याचा प्रयत्न
यावेळी राज यांनी दूध आंदोलनाला राज्यसरकारच दोषी असल्याचा आरोप केला. शेतकरी आंदोलन करणार असल्याचं माहीत असूनही त्यांच्यासोबत सरकारने चर्चा का केली नाही? असा सवाल करतानाच सरकार कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नसल्याने दूध दरासाठी आंदोलन सुरू झाल्याचं ते म्हणाले. अमूल सारख्या बाहेरच्या दूध कंपन्यांना महाराष्ट्रात घुसवण्याचा राज्यसरकारचा डाव असल्यानेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारच राज्य चालवतंय
सध्याचं महाराष्ट्र सरकार हे सांगकामे सरकार आहे. राज्य सरकार स्वत: काहीच करत नाही. केंद्रातून आदेश आल्यावरच ते कामाला लागतात. सध्या केंद्र सरकारच राज्य चालवत असून राज्यातील आहे त्या व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गड-किल्ल्याचं संवर्धन करा
राज यांनी यावेळी शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध असल्याचा पुनरुच्चार केला. पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी तलवारीची उंची वाढवली जात आहे. काहीही सुरू आहे. त्यापेक्षा महाराजांच्या गड-किल्ल्यांचं संवर्धन करा. त्यावर खर्च करा. तेच त्यांचं खरं स्मारक आहे, असं सांगतानाच स्मारकासाठी दहा हजार कोटींच्यावर खर्च होणार असून या स्मारकासाठी केंद्र आणि राज्याच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. शिल्पकार ठरलेला नाही, असं असताना केवळ स्मारकाचं चित्रं उभं केलं जात असल्याची टीकाही त्यांनी केली.