पुणे-प्रत्येकानं आपला धर्म आपल्या घरात पाळावा असं सांगत मुस्लीमांनी नमाज घरात पढावा रस्त्यात नाही असं मत मांडताना जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे. सरकार तुमच्या भावनांशी खेळ करते आहे त्यांच्या आश्वासनांना आणि राजकारणाला बळी पडू नका असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये मनसेच्या मेळाव्यात बोलताना केले .त्यांनी आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाला …आणि सर्वच जातीय आरक्षणाला आपला विरोध असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे .
मराठा समाजाने ज्या प्रकारे मोर्चे काढले त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडू नका. हकनाक स्वतःचा जीव गमावू नका असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले.काकासाहेब शिंदे या मुलाने नदीत उडी मारली. अशा प्रकारच्या घटना टाळा, जीव गमावून काहीही होणार नाही. जातीच्या आधारावर आरक्षण दिले तर जातीय तेढ निर्माण होईल. एका जातीला आरक्षण दिले तर दुसऱ्या जातीला द्यावे लागेल. मराठी मुला-मुलींनी या मागचे राजकारण काय सुरू आहे ते समजून घ्या असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
नमाज पढायला रस्ते कशाला हवेत तसंच नमाजासाठीची अजान देण्यासाठी भोंगे कशाला हवेत असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. हे भोंगे तुम्ही कुणाला ऐकवता असा सवाल विचारत ते बंद व्हायला हवेत असं ते म्हणाले. मी मला भेटणाऱ्या मुस्लीमांना सांगतो की सकाळपासून भोंगे कशाला हवेत नमाजासाठी त्यामुळे ते सगळे बंद करा, असं राज म्हणाले.
गुजराती व जैन समाजाचाही उल्लेख राज यांनी केला. मला भेटायला यातली बरीच मंडळी आली होती, परंतु त्यांना मी स्पष्टपणे माझी भूमिका सांगितल्याचे राज म्हणाले. श्रावणामध्ये तसेच पर्युषणामध्ये हे लोक फतवे बंद काढतात की कत्तलखाने बंद करा. कुणी काय खावं काय खाऊ नये हे ज्याचं त्यांनी ठरवावं . आपापला धर्म घरात ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करताना राज ठाकरे यांनी धर्माचं राजकारण बंद व्हायला हवं असं सांगितलं.
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा भाजपाने पुन्हा समोर आणला आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी सांगितले की निवडणुका होण्यापूर्वी राम मंदिर बांधण्यासाठी पावले उचलू. चार वर्षात तुम्हाला आज राम मंदिर आठवले का? असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. राम मंदिर बांधले गेले पाहिजे का? निश्चितपणे बांधले गेले पाहिजे पण निवडणुका झाल्यावर असे माझे स्पष्ट मत असल्याचेही राज ठाकरेंनी बोलून दाखवले सत्तेवर आल्या आल्याच खरे तर या सरकारने मंदिर बांधायला हवे होते. जय श्रीरामच्या विटांचे काय झाले? सगळ्यांकडून पैसै घेतले विटा घेऊन गेले, गंगाजळ वाटण्यात आले होते. त्या सगळ्याचे काय झाले? असेही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. देशात प्रगती काय झाली, विकास काय झाला ते सोयीस्करपणे लपवायचे आणि हा राम मंदिराचा विषय समोर आणायचा. म्हणजे काय झाले ते विचारायला कोणी येणारच नाही. जातीय दंगलीत जनतेला गुंतवायचे हा यामागचा डाव आहे. तुमचे घर उभे राहावे, संसार उभा राहावा म्हणून कोणीही करताना दिसत नाही असाही आरोप राज ठाकरे यांनी केला. तुमच्या भावनांशी खेळायचे, त्याचे राजकारण करायचे आणि तुमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे हे सरकारचे धोरण आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली.
राजकारणी तुम्हाला वापरून घेतायत, शहरांचा विकास करायच्या ऐवजी, घरांचे प्रश्न सोडवण्याऐवजी धार्मिक प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवलं जातं पण त्याला बळी पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली असून तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गुजरात या एका राज्याचे नाही असं त्यांनी सांगितलं.