मुंबई-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट पार पडली आहे. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या या भेटीनंतर राज्यातील राजकारण चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे देखील राज ठाकरे यांनी कौतुक केले. येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चा रंगत आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यात जवळपास दोन तास बैठक झाली. स्वाभाविकच या भेटीत राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीन गडकरी यांनी जरी ही राजकीय भेट नाही असे म्हटले असले तरी या दोन तासांच्या बैठकीत त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
…ही एक कौटुंबिक भेट- गडकरी
या भेटीबाबत गडकरी म्हणाले की, “ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही” ही एक कौटुंबिक भेट असल्याचे बोलले गेले होते. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट म्हणता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

