बिहार, आसाम आणि कर्नाटक या तीन राज्यांत वादळ आणि पावसाने मोठा विध्वंस केला आहे वीज पडून आणि पुरामुळे 57 जणांना जीव गमवावा लागला आहे. आसाममध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. येथे ब्रह्मपुत्रेला आलेला पूर आणि त्याच्या बाजूने वाहणाऱ्या नद्यांनी असा कहर केला आहे की, शेकडो गावांना जलसमाधी मिळाली आहे. त्याचबरोबर 7 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. पिकेही नष्ट झाली आहेत.आसाममध्ये 500 हून अधिक लोकांना रेल्वे रुळांवर राहावे लागत आहे. येथे आतापर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिहारमध्ये वीज पडून सर्वाधिक 33 मृत्यू झाले आहेत.
त्याचवेळी कर्नाटकातही 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. खराब हवामानामुळे दिल्लीहून आलेल्या 10 विमानांना अमृतसर विमानतळावर उतरावे लागले.बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी वादळ आणि वीज पडून 33 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. शनिवारी आणि रविवारी काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडू शकतो, असे राज्य हवामान विभागाचे म्हणणे आहे. कारण येथे आता मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे.आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनानुसार, राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये सुमारे 7.12 लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. जमुनामुख जिल्ह्यातील दोन गावांतील 500 हून अधिक कुटुंबांनी रेल्वे ट्रॅकवर तात्पुरता निवारा केला आहे. एकट्या नागाव जिल्ह्यात 3.36 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत, तर कचर जिल्ह्यात 1.66 लाख, होजईमध्ये 1.11 लाख आणि दरंग जिल्ह्यात 52,709 लोक बाधित झाले आहेत.कर्नाटकात प्री-मॉन्सून सुरू झाल्याने परिस्थिती बिकट आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. NDRFच्या चार तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.पावसामुळे 23 घरांचे नुकसान झाले आहे. महसूलमंत्री आर. अशोक म्हणाले की, हवामान खात्याने चिकमंगळूर, दक्षिण कन्नड, उडुपी, शिवमोग्गा, दावणगिरी, हासन आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बंगळुरूमधील अनेक भागांना भेट दिली.