मुंबई-नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखो प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.यावेळी ते बोलत होते .
श्री. शिंदे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, या सर्व क्षेत्रात महाराष्ट्रासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार प्रधानमंत्र्यांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी प्रयत्न करेल.
नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. प्रधानमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना निमंत्रित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव निधी – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
रेल्वेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य आहे. यावर्षी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५०० कोटी रूपयांच्या निधींची तरतूद केली गेली आहे. ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास आले आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली आहे. येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या धावतील.
रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री यांचे योगदान महत्त्वपूर्ण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस गतीने धावेल आणि महाराष्ट्रातील जनतेला आणि भाविकांना आनंद मिळेल. मुंबई आणि पुणे यासह अनेक शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्याने याचा लाभ व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, सामान्य नागरिकांना होणार आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीने वंदे भारत वर रचलेल्या संस्कृत कवितेचे प्रधानमंत्र्यांनी कौतुक केले.
वंदे भारत एक्सप्रेस गाडीविषयी

- आरामदायी आणि आनंददायी रेल्वे प्रवास हे वंदे भारत एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य
- वंदे भारत एक्सप्रेमसमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, झोपण्यायोग्य आसने, टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, एलईडी प्रकाश योजना, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित रीडिंग लाइट आणि कनसिंल्ड रोलर पडदे, ‘आधुनिक मिनी-पॅन्ट्री’ आणि चालक दलाशी संवाद साधण्याकरिता प्रवाशांसाठी ‘इमरजन्सी टॉक-बॅक’ युनिट कार्यान्वित
- उत्तम उष्णता वायुविजन आणि जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यांसह वातानूकुलित प्रणाली सारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा
- इंटेलिजेंट वातानूकुलित प्रणाली हवामान परिस्थितीनुसार कूलिंग समायोजन
- स्वदेशात तयार झालेली सेमी-हाय स्पीड सेल्फ प्रोपेल्ड ट्रेन सेट,१६० किमी प्रति तास वेग गाठण्याची वेळ १२९ सेकंद
- प्रवाशांसाठी ३.३ (राइडिंग इंडेक्स) सह उत्तम आरामशीर प्रवास
- स्वयंचलित प्लग दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे
- एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्विहंग सीट्स
- GSM/GPRS द्वारे नियंत्रण केंद्र / देखभाल कर्मचाऱ्यांना एअर कंडिशनिंग, कम्युनिकेशन आणि फीडबॅकचे निरीक्षण करण्यासाठी कोच नियंत्रण व्यवस्थापन प्रणाली
- जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यासह उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्रेसरचा वापर करून उत्तम उष्णता वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग नियंत्रण
- वातानुकूलित हवेच्या ध्वनीरहित आणि समान वितरणासाठी विशेष वातानुकूलित डक्ट
- दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय
- टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट
- ब्रेल अक्षरांमध्ये सीट क्रमांकासह आसन हँडल
- प्रत्येक कोचमध्ये ३२ प्रवासी माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम
- उत्तम ट्रेन नियंत्रण व्यवस्थापनासाठी स्तर –।। संरक्षा एकीकृत प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रासह कवच प्रणाली (ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टीम) सुरू
- प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन प्रकाश व्यवस्था,अग्निशमन सुरक्षा उपाय
- ४ प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे ज्यात डब्याच्या बाहेर मागील दृश्य कॅमेरे
- सर्व डब्यांमध्ये फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम व इलेक्ट्रिकल क्यूबिकल्स आणि टॉयलेटमध्ये एरोसोल आधारित फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम यांसारखे उत्तम
- प्रत्येक कोचमध्ये ४ आपत्कालीन खिडक्या
- इमर्जन्सी टॉक बॅक युनिट्स
- व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधेसह ड्रायव्हर-गार्ड संवाद
- अंडर- स्लंग इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी उत्तम फ्लड प्रूफिंग ज्यात ६५० मिमी पूर पाण्यामध्ये काही होणार नाही
मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ठळक वैशिष्ट्ये
- मुंबई ते सोलापूर अशी धावणारी ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन
- आर्थिक राजधानीला महाराष्ट्रातील कापड आणि हुतात्मा शहराशी जोडणार
- सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांशी जलद कनेक्टिव्हिटी
- या मार्गावर सध्या कार्यान्वित असलेल्या सुपरफास्ट ट्रेनला ७ तास ५५ मिनिटे लागतात, तर वंदे भारतला ६ तास ३० मिनिटे लागणार, यामुळे प्रवाशांचा दीड तास वाचणार
- जागतिक वारसाला तीर्थक्षेत्र,टेक्सटाईल हबशी जोडणार
- पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक हब पुणे यांना चालना मिळणार
- भोर घाटातील खंडाळा लोणावळा घाट विभागात बँकर इंजिनशिवाय ३७ मीटरला १ मीटर घाट चढणारी पहिली वंदे भारत ट्रेन
मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ठळक वैशिष्ट्ये
- ही देशातील १० वी वंदे भारत ट्रेन
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि साईनगर शिर्डी दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी
- आर्थिक राजधानीला महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांशी जसे की नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डीला जोडले जाणार
- थळ घाट म्हणजे कसारा घाट विभागात बँकर इंजिनशिवाय ३७ मीटरला १ मीटर घाट चढणारी पहिली वंदे भारत ट्रेन

