पुणे : मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेला आणि फरार घोषित केलेला आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे तसेच त्याच्या नातेवाइकांच्या घरावर बुधवारी (ता.२८) पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्याच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांत फसवणुकीसाठी आवश्यक असलेली विविध कागदपत्रे या कारवाईत पोलिसांच्या हाती आली आहेत.ब-हाटेसह त्याच्या साथीदारांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप यांच्यासह 13 जणांच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
हडपसर येथील गुन्ह्यात बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांनी संघटितपणे टोळी करून खंडणी मागणे , जीवे मारण्याची धमकी देणे , बंगला बळकावण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्यासह त्यांच्याविरुद्ध शहर व ग्रामीण भागामध्ये 14 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्या टोळीतील अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र बऱ्हाटे अद्याप फरार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तो पोलिसांच्या हाती आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यानंतर त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. त्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी बुधवारी सकाळी परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी तीन पथके तयार केली आणि ब-हाटेच्या घरावर छापे टाकले. धनकवडी, लुल्लानगर आणि बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या घरावर एकाच वेळी छापे टाकले आहेत. ब-हाटे याच्या धनकवडी येथील घरातून पोलिसांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.सकाळपासून सुरू असलेल्या कारवाईत पोलिसांनी आत्तापर्यंत हजारो कागदपत्रे आणि साहित्य जप्त केले आहे. त्यात स्टॅम्पपेपर, जमिनींची कागदपत्रे, सात-बारा उतारे, शिक्के यासह अनेक बाबींचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. दरम्यान पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत असून कारवाई अद्याप सुरू आहे.

