पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर आज (बुधवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ‘एसीबी’ने छापा टाकला. अडीच तासाच्या चौकशीनंतर समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे आणि दोन कर्मचा-यांना ताब्यात घेतले. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयावर छापा पडला असून शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजपच्या गोटातही प्रचंड खळबळ उडाली आहे. भोसरीतील प्रभाग क्रमांक सातमधून लांडगे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. दुपारी तीन वाजता आजची स्थायी समितीची ऑनलाइन सभा संपली. आजच्या सभेत तब्बल 31 कोटी 66 लाख 89 हजार 607 रुपयांच्या विषयाला मान्यता देण्यात आली.सभा संपल्यानंतर चौथ्या मजल्यावर आयुक्तदालनात एका विषयावर सादरीकरण सुरु होते. तर, स्थायीचे सदस्य तिस-या मजल्यावरच होते. स्थायी समितीची पत्रकार परिषदही होणार होती.साडेचारच्या सुमारास सादरीकरण संपले. त्यानंतर पदाधिकारी तिस-या मजल्यावर आले. त्याचदरम्यान स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी तळमजल्यावर लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांना तिसऱ्या मजल्यावर घेऊन आले.स्थायी समितीच्या दालनात त्यांना घेऊन गेले. दालन बंद करून घेत त्यांची चौकशी सुरू केली. त्यांच्यासह इतर दोघांचीही कसून चौकशी केली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्वीय सहाय्यक पिंगळे आणि दोन कर्मचा-यांना एसीबीचे अधिकारी मोटारीतून घेऊन गेले.
त्यापाठोपाठ स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनाही पावणेसातच्या सुमारास एसीबीचे अधिकारी त्यांच्या दालनातून खाली घेऊन आले आणि त्यांना मोटारीतून घेऊन गेले.एसीबीच्या अधिका-यांनी सापळा लावला होता. स्थायी समिती दालनात येणा-या -जाणा-या प्रत्येकाच्या हालचाली बारकाईने टिपल्या जात होत्या. एसीबीच्या अधिका-यांनी काही अधिकारी, पदाधिका-यांकडेही चौकशी केली. एसीबीच्या अधिका-यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचीही भेट घेतली.या लाच प्रकरणामुळे महापालिका वर्तुळासह शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कारवाई दरम्यान महापालिका भवनात, परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, तक्रार नेमकी कोणी केली. याबाबत आद्यपपर्यंत समजू शकले नाही.

