पुणे: ज्यांचे सौंदर्य अगणिक कामदेवतेपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यांचे शरीर निलमेघाप्रमाणे आहे, पितांबर नेसलेले त्यांचे रुप लखलखत्या विजेप्रमाणे दिसत आहे, अशा पावनरुपी श्रीरामाला वंदन करुन या रघुनंदन ह्या कार्यक्रमात रामावरच्या आणि कृष्णावरच्या अनेक रचनांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरश: भूरळ घातली. नृत्यभक्ती फाउंडेशन तर्फे रघु-नंदन भरतनाट्यम नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरिचा उच्चार या प्रवाहात तल्लीन होण्यासाठी रघुनंदन ही कथा आयोजिली होती. मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशवंदना केली गेली, ठुमक चलत रामचंद्र, राम जन्मला गं सखी राम जन्मला.., श्रीरामचंद्र कृपालू भज हर अशा वेगवेगळ्या रामावरच्या रचना सादर केल्या. कृष्णाबरोबर होळी खेळणा-या गोपिका, राधे बरोबर झालेलं कृष्णाच भांडण आणि विरह, कृष्ण आणि कालियाचं द्वंद्व असे अनेक प्रसंग विविध रचनांद्वारे सादर करण्यात आले. तर कार्यक्रमाची सांगता दशावताराने झाली. यामध्ये कृष्ण आणि रामावरचं सुंदर भजन आणि दोघांचे दहा अवताराचे सुंदर चलचित्र सादर करण्यात आले. कृष्णाच्या नामगजरात कार्यक्रमाची सांगता झाली.
कुहू, ऐश्वर्या, सायली, नेहा, अंकिता,तेजोमयि, हर्षिता, ईश्वरी, जान्हवी, मेघा, सिमरन, तन्वी, देवयानी या कलाकारांनी भरतनाट्यम नृत्याविष्कार सादरीकरण केले.
नृत्य कार्यक्रमाद्वारे रामाच्या आणि कृष्णाच्या आचार विचारांची देवाण घेवाण करत नामस्मरणामधून परमेश्वर रुपी शक्ती सदैव आपल्याला साथ देईल आणि आपला मार्ग आनंददायी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मत नृत्यभक्ती फाउंडेशनच्या सई परांजपे यांनी व्यक्त केले.