पुणे :
महापालिकेच्या सोनवणे प्रसूतिगृहामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलेला कोरोना संक्रमण झाल्याचे समोर आल्यानंतर तिच्यावर उपचार करणाऱ्या दोन डॉक्टरसह पाच ते सहा नर्सना विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असताना कोरोना तपासणीसाठी या रुग्णास अन्यत्र पाठविण्या ऐवजी या सोनावणे हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे याबाबत सहायक आरोग्य प्रमुख वावरे यांना काहीजणांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. दरम्यान रुग्णालयात खबरदारी बाळगण्यात येत आहे. शहरात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत चालली आहे. आतापर्यत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३० पेक्षा अधिक झाला आहे. पालिकेकडून सर्वेक्षण, तपासण्या, विलगिकरण, जनजागृती, प्रत्यक्ष उपचार आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील माध्यवस्तीसह आणखी २२ ठिकाणे सील करण्यात आली आहेत. कोरोनाचा सामाजिक संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोनवणे रुग्णालयात दाखल झालेली महिला गरोदर होती. तिला ताप आणि अशक्तपणा असल्याने डॉक्टरांनी तिच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते.
या तपासणीचा वैद्यकीय अहवाल सोमवारी पाॅझिटिव्ह आला. या महिलेला कोरोना संक्रमण झाल्याचे निष्पन्न होताच उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे सोनवणे रुग्णालयात खळबळ उडाली आहे. या महिलेवर उपचार करीत असलेल्या दोन डॉक्टर आणि सहा नर्सचे विलगिकरण करण्यात आले आहे.
त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयातील एक नर्स कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पालिकेच्या सोनवणे रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांना खबरदारी घेण्याच्या आणि आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विलगिकरण करण्यात आलेल्या वैद्यकीय सेवकांव्यतिरिक्त अन्य सेवकांवर ही लक्ष ठेवण्यात येत आहे.

