पुणे – पुणे शहराने खासदार, आमदरा, नगरसेवक मोठ्या संख्येने देऊन भारतीय जनता पक्षाला समृद्ध केले आहे. लोकप्रतिनिधी हा पक्षाचा चेहरा असतो. विजय काळे आठ वर्षे लोकप्रतिनिधी नसतानाही त्यानंतर 2014 मध्ये लोकांनी त्यांना आमदार म्हणून निवडून देऊन स्वीकारले. त्यांची मतदारांशी असलेली नाळ जीवंत आहे. यातूनच स्पष्ट होते की लोकांमध्ये जाऊन, लोकांच्या घरी जाऊन त्यांची कामे करणारे लोकप्रतिनिधी फक्त भाजपमध्ये आहेत, असे नगरविकास राज्य मंत्री योगेश सागर यांनी आज येथे सांगितले.
शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांच्या पाच वर्षाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन राज्यमंत्री सागर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले होते. कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि निवृत्त आयपीएस अधिकारी वसंत कोरेगावकर पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष सतीश बहिरट, खडकीचे अध्यक्ष चिंतन शहा, महिला आघाडीच्या अध्यक्षा भावना शेळके, युवामोर्चाचे अध्यक्ष सौरभ कुंडलिक, आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कांबळे, उपाध्यक्ष कमलेश चासकर, निलमाताई खाडे, सोनालीताई लांडगे, सुनिताताई वाडेकर, आदित्य माळवे, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, अर्चनाताई मुसळे, आदी नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात घरेलू महिला कामगारांच्या नेत्या मेधा थत्ते, टेल्को एम्प्लॉइज युनियनच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल संतोष दळवी यांचा सत्कार योगेश सागर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार निधीतून विजय काळे यांनी ग्रंथालयासाठी प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची पुस्तके घेतली आहेत. या पुस्तकांच्या संचाचे नऊ ग्रंथालयांना वितरण गोगावले, गोयल आणि कोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
योगेश सागर म्हणाले, भाजपच्या सर्वच ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पुणेकरांनी गेल्या पाच वर्षात निवडले आहे. लोकप्रतिनिधी हा पक्षाचा चेहरा असतो. हे लोकप्रतिनिधी पुणेकरांनी दिलेल्या पाठिंब्याची परतफेड त्यांच्या कामातून करतच आहेत. या पुणे शहराला अधिकपटीने जर कोणी दिले असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे कामच त्यांनी सुरू केले असल्याचे सध्या शहरात फिरताना दिसते. विधानसभेत प्रश्न मांडताना विजयरावांच्या प्रश्नांना मत्र्यांना उत्तरे द्यावीच लागतात. त्यांच्या प्रश्न मांडण्याचा सचोटीमुळे अनेकदा मुख्यमंत्रीच स्वत: त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात याचा मी साक्षिदार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, गेल्या पाच वर्षात सबका साथ सबका विकास या धेय्याने आम्ही काम करत आहोत. या मागची आमची भूमिका आता मतदारांनी तपासावी, त्यासाठीच हा कार्य अहवाल आहे. अशा प्रकारे आपण केलेल्या कामाची महिती देणारे अहवाल फक्त भाजपचेच लोकप्रतिनिधी काढतात. मेट्रोच्या कामाच्या प्रगतीचा अनुभव सगळेच घेत आहेत. कारण आमचं राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे कमी बोलून काम करणारं सरकार आहे. आम्ही सांगितलेला कार्यक्रम राबवणारं सरकार आहे.
कृष्णमार गोयल म्हणाले, ज्या मेट्रोची चर्चा फक्त पुणेकर ऐकत होते त्या मेट्रोचं का या सरकारमुळे सुरू झालेलं बघायला मिळालं आहे. यापेक्षाही गुरूजनांचा त्यांच्या घरी जाऊन कृतज्ञता पूर्वक गौरव करणारे आमदार विजय काळे मला जास्त महत्वाचे वाटतात. वसंत कोरेगावकर म्हणाले, मी माझ्या पोलिस खात्यातील कारकिर्दीत अनेक आमदार, खासदार मंत्री बघितले, त्यांचे स्वभाव, कॅरेक्टर बघितलं, पण प्रगल्भ विचारांचा अन ठाम निर्णय घेणारा विजयरावां इतका साधा आमदार पहिल्यांदाच बघितला. त्यांनी मला त्यांचा मतदार म्हणून त्यांच्या कार्य अहवाल प्रकाशनासाठी बोलावले याचा मला अभिमान आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना आमदार काळे म्हणाले, या मतदार संघात शिवाजीनगर, विद्यापीठ चौक, बोपोडीचौक अशा प्रमुख रस्त्यांवर असलेली वाहतुकीची समस्या सोडवली नाही तर पुन्हा मत मागायला येणार नाही असं मी 2014 साली सांगितले होते. पण गेल्या पाच वर्षात नगरसेवक, नागरीकांच्या मदतीने या सर्व वाहतुकीच्या प्रश्नांवर उपाय योजना सुरू करू शकलो आहे. या शिवाय हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो, आयटीआय, चतुशृंगीची पाण्याची टाकी, भांबुर्डा वनउद्यान अशा विविध विकास कामांचा आढावा घेऊन आता याचे मूल्यमापन व परिक्षण मतदारांनी करावे असे आवाहन केले. प्रारंभी मतदारसंघाचे अध्यक्ष बहिरट यांनी सर्वांचे स्वागत केले तर खडकीचे अध्यक्ष चिंतन शहा यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. वर्षा डोमल यांनी केले. कार्यक्रमात मन:शक्ती केंद्राच्यावतीने मान्यवरांना पुस्तके भेट देण्यात आली.

