पुणे-“जग ज्यांची पूजा करते त्या श्रीरामांना जर कोणता भक्त सर्वाधिक प्रिय असेल तर तो हनुमान आहे. बलाचे प्रतिक असलेले हनुमान हे नेहमीच श्रीरामांच्या पायाशी असण्याला आपले भाग्य समजत, विनम्रता आणि भक्ती यांचे हेच उत्कृष्ट उदाहारण आहे. भक्ती अशी असावी जी देवालाही तुमचे स्मरण करणे भाग पाडेल. एखादी गोष्ट मागण्यापेक्षा ती कमावणं जास्त महत्वपूर्ण असतं, त्यासाठी स्वत:मध्ये पात्रता निर्माण केली पाहिजे. याचना आणि प्रार्थना हे मागण्याचे दोन प्रकार आहे. आज मंदिरामध्ये पुजारी कमी आणि भिकारी जास्त झाले आहेत. मात्र देवाकडे काही मागायचेच असेल तर ते अवगुणांपासून दूर राहण्याची बुद्धी आणि परमेश्वराच्या सेवेत राहण्याचे सौभाग्य मागावे,” असा संदेश मुनिश्री प.पु. 108 पुलकसागर महाराज यांनी दिला.
मुनिश्री प.पू. 108 पुलकसागर महाराज यांचा चार्तुमास पुण्यातील धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स येथे चालू आहे. सकल जैन वर्षायोग समितीतर्फे येथे चातुर्मासानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवातील अठराव्या पुष्पात मुनिश्री ‘मुककर जीने की कला’ विषयावर बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष चकोर गांधी, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, सुरेंद्र गांधी, वीरकुमार शहा हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मराठी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, अखिल मंडई गणपती मंडळाचे प्रमुख अण्णा थोरात, मराठवाडा मित्रमंडळ शैक्षणिक संस्थेचे सचिव भाऊसाहेब जाधव, हुजूरपागा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शामा जाधव, उद्योजक महेश मेहता यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले व प्रवचनाचा लाभ घेतला. याप्रसंगी अखिल मंडई मंडळाचे प्रमुख अण्णा थोरात यांनी मुनिश्रींना मंडई गणपतीची प्रतिमा भेट दिली व गणेशोत्सव कालावधीत अखिल मंडई गणपती मंडळास येण्यास विनंती केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उद्योजक अनिल लोढा आणि परिवार यांच्यातर्फे कलशस्थापना करण्यात आली. अलका दोशी यांच्या हस्ते पादप्रक्षालन तर सरिता पाटील यांच्या हस्ते शास्त्रभेट करण्यात आले. यावेळी स्वारगेट येथील जिनेंद्र ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
मुनिश्री पुढे म्हणाले, तुमच्यावरील उपकार शेवटच्या श्वासापर्यंत विसरू नका. तसेच तुम्ही कौणावर उपकार केले तर ते लगेच विसरून जा हाच मानवतेचा नियम आहे. आणि मोठे बनण्याची हीच गुरूकिल्ली आहे. पण आज नेमके याच्या उलट स्थिती दिसत आहे. आज आपण एखाद्याने केलेला उपकार सोयीस्करपणे विसरतो, तर आपण एखाद्यावर केलेल्या उपकारांची वारंवार गनती करत असतो. यामुळे माणूस दुखावला जाऊन परिणामी तो आपल्यापासून दुरावतो. माणसे तोडण्यात नव्हे जोडण्यात तुमचे मोठेपण आहे. त्यामुळेच संकुचित वृत्ती सोडून मनुष्याने दर्यादिल व्हावे” असे ते म्हणाले.
मराठी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी यांनी याप्रसंगी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. मुनिश्रींनी त्यांना पुस्तके भेट दिली. याप्रसंगी त्या म्हणाल्या, चित्रपट क्षेत्रातील जीवन हे अतिशय धकाधकीचे असते. सतत धावपळ, व्यस्तता यामुळे जिथे स्वत:साठीदेखील वेळ देता येत नाही, तिथे अध्यात्म आणि सत्संगाशी जोडले जाणे हे दुर्मिळच असते. चातुर्मासानिमित्त या कार्यक्रमात येऊन मुनिश्रींचे विचार ऐकता आले, त्यांचा आशीर्वाद घेता आला. पुन्हा एकदा सत्संगाशी, अध्यात्माशी जुळता आले, याचा खरोखर आनंद होत आहे.”
मराठवाडा मित्रमंडळ शैक्षणिक संस्थेचे सचिव भाऊसाहेब जाधव म्हणाले, चातुर्मासानिमित्त पुण्यात मुनिश्रींचा सत्संग होत आहे, ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आपण दैनंदिन जीवनात इतके व्यस्त असतो, की चांगले काम करण्यासाठी अध्यात्माशी जुळण्यासाठी आपल्याकडे फारसा वेळ नसतो. अनेकवेळा चांगले काय आणि वाईट काय यातला फरक आपल्याला कळत नाही. अशावेळी योग्य मार्ग दाखविण्याचे काम संत करतात. संताच्या सानिध्यात आल्यावर जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन आपल्याला मिळतो. अशा संतांना ऐकण्याची संधी मिळण्यासाठी तसेच जीवनाचे सार्थक करण्यासाठी या महोत्सवासारखे कार्यक्रम अतिशय महत्वपूर्ण ठरतात.”
या प्रवचन प्रसंगी भावीकांनी मोठी गर्दी केली होती. समितीचे उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. आर.एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे मंडपाजवळ 2 सप्टेंबर पर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू आहे. यानिमित्त आर.एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे अत्याधुनिक बसही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी ज्ञानगंगा महोत्सवातील मुनिश्रींच्या प्रवचनाचे अखेरचे 22वे पुष्प गुंफले जाईल. त्यानंतर लगेचच सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत जिनशासनाचे महास्तोत्र श्री उवस्सहग्गर स्तोत्र याचे सामुहिक पठन संपन्न होणार आहे. यासाठी पुरूषांसाठी सफेद व महिलांसाठी केसरी वस्त्र हा ड्रेसकोड असणार आहे. भाविकांनी यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष शोभा धारिवाल आणि कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.


