पुणे- “संत आणि श्रावक यांचे जीवन एकमेकांपासून पूर्णत: भिन्न असते. संतांचे जीवन त्यांची साधना अतिशय कठोर असते. मात्र भिन्न परिस्थितीतही हे दोन्ही घटक एकमेकांचे आधार असतात. आणि ज्यावेळी संस्कृतीवर, धर्मावर एखादे संकट येते त्यावेळी हे लोक संस्कृतीच्या रक्षणासाठी उभे असतात. त्यामुळेच ज्यावेळी संथारा प्रथेवर प्रशासनातर्फे हल्ला करण्यात आला, तेव्हा केवळ संतच नाही. तर संपूर्ण समाज या हल्ल्याचा सामना करण्यासाठी, तो थोपावून लावण्यासाठी एकत्र आला. या एकतेसमोर प्रशासनालाही झुकावे लागले. एकूणच रक्षाबंधन हा संस्कृती रक्षणाचा संकल्प आहे. श्रावक आणि मुनी जेव्हा एकमेकांची रक्षा करतात, संस्कृतीची रक्षा करतात तेच खर्या अर्थाने रक्षाबंधन असते,” अशा शब्दांत मुनिश्री प. पु. 108 पुलकसागर महाराज यांनी रक्षाबंधनाचे महत्व समजावून सांगितले.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे सुरू आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे पंधरावे पुष्प गुंफतांना मुनिश्रींनी ‘राखी क्या होती है?’ या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर.एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जानवी धारिवाल, उपाध्यक्ष अरविंद जैन, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, संजीव नाईक, सुदिन खोत, उत्कर्ष गांधी आदी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी वेदभवन गुरूकुलचे प्रमुख वेदमुर्ती मोरेश्वर घैसास गुरूजी, प्राइड उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक एस.पी. जैन, त्यांचे बंधू डी.पी.जैन, कोल्हापूर येथील कुंभोज बाहुबली विद्यापीठ क्षेत्रचे सचिव डी.सी. पाटील, ज्येष्ठ व्यावसायिक अजित जैन यांनीही उपस्थित राहून मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. कोल्हापूरच्या कुंभोज बाहुबली विद्यापीठ क्षेत्रचे सचिव डी.सी. पाटील यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून मुनिश्रींना कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण दिले. तसेच आर.एम. धारिवाल फाऊंडेशनतर्फे कोल्हापूरमधील कुंभोज बाहुबली क्षेत्र येथील गुरूकुलसाठी स्मार्ट बोर्ड देण्याची घोषणा समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल यांनी केली.
कार्यक्रमाची सुरवात श्रीमंदर हिराचंद शहा आणि परिवार यांच्या हस्ते कलशस्थापनेने झाली. त्यानंतर लोणंद येथील जिनशरणम् महिला मंचतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
रक्षाबंधनानिमित्त समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, आर.एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जानवी धारिवाल आणि मुंबईच्या प्राइड उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक एस.पी. जैन व कुटुंबिय यांनी मुनिश्रींच्या पिंछ्छीला राखी बांधली व रक्षा बंधनाच्या सोहळा प्रारंभ झाला. पुलक सखी मंचच्या महिलांनी बनविलेली भव्य राखी मुनिश्रींना अर्पण करण्यात आली.
यावेळी वेदमुर्ती घैसास गुरूजी यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. मुनिश्रींनी त्यांना पुस्तके भेट दिली. यावेळी वेदमुर्ती घैसास गुरूजी म्हणाले, त्याग काय हे कानाने ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहिला तर तो अधिक चांगल्याप्रकारे समजतो. मुनिश्री हे अशा त्यागाचे, समर्पणाचे, तपश्चर्येचे मुर्तिमंत प्रतीक आहेत. या चातुर्मासानिमित्त भवसागरातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखविणार्या मुनिश्री पुलकसागर महाराज यांच्या दर्शनाची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.” मुनिश्रींनी आपल्या वेदशाळेत येऊन तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी विनंतीदेखील घैसास गुरूजी यांनी यावेळी केली.
रक्षाबंधणानिमित्त समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमात उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच दुपारी रक्षाबंधनाचा मोठा कार्यक्रम संपन्न झाला.
आर.एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे दि. 12 ऑगस्टपासून मंडपस्थळी रक्तदान शिबीर चालू असून त्यासाठी आर.एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे अत्याधुनीक बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.


