पुणे-२२ ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरणाऱ्या ‘भीमथडी जत्रे’त ‘अन्नदाता–सेंद्रिय अन्न महोत्सव’ हे विशेष आकर्षण असणार आहे. या ‘अन्नदाता–सेंद्रिय अन्न महोत्सवा’मध्ये एकूण ४१ स्टॉल्स असून, त्यापैकी ३६ स्टॉल्सवर शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतमाल व अन्नधान्य विक्रीसाठी उपलब्ध असेल, तर ५ स्टॉल्सवर सेंद्रिय घटक वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय दिनदर्शिका, वनराई अंक प्रकाशन, जनजागृतीपर प्रदर्शन, व्याख्याने, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भीमथडी जत्रे’मध्ये सेंद्रिय अन्नपदार्थांचा प्रसार करणारा अशा प्रकारचा अन्न महोत्सव पहिल्यांदाच भरत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी ‘भीमथडी जत्रे’च्या स्थळी सकाळी ११ वाजता आदिवासी सेंद्रिय शेतकरी राहीबाई पोपेरे (भीमाशंकर) यांच्या हस्ते होणार आहे. राहीबाई पोपरे या पिढीजात सेंद्रिय शेतकरी असून त्यांनी १५० हून अधिक गावरान बियाणांची पेढी तयार केली आहे.
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, येरवडा कारागृह अधीक्षक स्वाती साठे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, साताऱ्याच्या वेदांतिका राजेभोसले, भीमथडी जत्रेच्या संयोजिका सुनंदाताई पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. वनराई संस्थेचा ‘सुरक्षित अन्न–शेतापासून ताटापर्यंत’ हा विशेषांक आणि ऋतूमानानुसार आहार व जीवनशैलीची माहिती देणारी आकर्षक रंगीत (२०१८ची) दिनदर्शिका यांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटनप्रसंगी केले जाईल. ही दिनदर्शिका व अंक या महोत्सवामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. वनराई, पूर्ण पुणे, वसुंधरा स्वच्छता अभियान, ग्रामगौरव प्रतिष्ठान, सस्टेनेबल लिव्हिंग स्टोअर आदींच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘अन्नदाता–सेंद्रिय अन्न महोत्सव’ आकारास आला आहे. सेंद्रिय शेती चळवळीचा प्रचार–प्रसार करणारे पुणे शहर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते यात सक्रीय सहभागी झालेले आहेत. हा अन्नदाता सेंद्रिय अन्नमहोत्सव दि. २२ ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरु राहणार आहे.
रसायनमुक्त, भेसळमुक्त, विषमुक्त व सुरक्षित अशा सेंद्रिय अन्नधान्याचा अधिकाधिक प्रचार–प्रसार व्हावा आणि हे सेंद्रिय अन्नपदार्थ शेतकऱ्यांकडून ग्राहकांना थेट व सुलभतेने उपलब्ध व्हावेत हा हेतू या ‘अन्नदाता–सेंद्रिय अन्न महोत्सवा’च्या केंद्रस्थानी आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या ३६ शेतकरी गटांचे स्टॉल्स या अन्नमहोत्सवात असतील. या स्टॉल्सवर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतमाल जसे की कडधान्ये, डाळी, भरडधान्ये, हातसडीचा तांदूळ, खपली गहू, लाकडी घाण्याचे तेल, जवस, सेंद्रिय गुळ, सैंधव मीठ, तरोटा कॉफी, अंबाडीपासून केलेली विविध उत्पादने, हळद, मसाले अशा सुमारे ४५ अन्नधान्य वस्तूंचा समावेश असेल. या सर्व अन्नधान्यांची इथे रास्त दरात विक्री होणार आहे. पुणेकरांना खाद्यपर्वणी असणाऱ्या या ‘अन्नदाता – सेंद्रिय अन्न महोत्सवा’त ५ स्टॉल्सवर हळद, मीठ–मिरचीपासून भाजीपाला व धान्यापर्यंत सर्व सेंद्रिय घटक वापरून शिजवलेले गरमागरम अतिशय रुचकर अन्नपदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध असतील, जेणेकरून ग्राहकाला सेंद्रिय अन्नाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येईल. यामध्ये विविध प्रकारच्या भाकऱ्या, हुरड्याचा बटाटावडा, तुरीचा पुलाव, तुरीच्या शेंगांची आमटी, मोदक आंबेडाळ, कोकणीवडे, हुलगा भाजी, हातसडीचा भात व उडदाची आमटी अशा खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
नागरिकांमध्ये अन्न, आहार, आरोग्य आणि पर्यावरण याविषयी जागरूकता घडवून आणण्यासाठी सुरक्षित अन्न, अन्न हेच औषध, पारंपरिक अन्नधान्यांचे आहारातील महत्व, गच्चीवरील बाग अशा विविध विषयांवर तज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शनपर चर्चासत्रांचे आयोजन या महोत्सवाच्या काळात होणार आहे. तसेच सुरक्षित अन्न आणि शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व विशद करणारे भव्य प्रदर्शनही येथे मांडण्यात येणार आहे. भीमथडी जत्रेचे प्रवेश शुल्क (केवळ रु. ३०) भरून ‘अन्नदाता–सेंद्रिय महोत्सवा’च्या दालनात नागरिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे सुरक्षित अन्नाविषयीचे प्रदर्शन, व्याख्याने व चर्चासत्रे यांचा लाभ घेण्यासाठी भीमथडीच्या प्रवेशशुल्काशिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी या ‘अन्नदाता–सेंद्रिय महोत्सवा’ला भेट द्यावी आणि आपले अन्न, आहार व आरोग्य याविषयी जागृत व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ज्या नागरिकांना शुद्ध व सात्विक असे सेंद्रिय अन्नधान्य हवे असेल त्यांनी www.organicannadata.comया वेबसाईटला भेट द्यावी. या वेबसाईटवर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि विक्रेत्यांचे संपर्क पत्ते व फोन क्रमांक उपलब्ध आहेत. नागरिकांनी या अन्नमहोत्सवात संपूर्ण चार दिवस सहकुटुंब यावे, खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा आणि सेंद्रिय शेतीतून तयार झालेले उत्तम दर्जाचे धान्य, डाळी, फळे इत्यादींची खरेदी करावी, तसेच येथून पुढे सातत्त्याने सेंद्रिय पदार्थांचा आग्रह धरावा व या लोकचळवळीचे घटक व्हावे असे आवाहन आयोजकांनी याप्रसंगी केले आहे. तसेच अन्नदाता सेंद्रिय अन्न महोत्सव भीमथडी जत्रेमध्ये आयोजित करण्यास भीमथडी जत्रेच्या संयोजिका आणि बारामती एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल अन्नदाताच्या संयोजकांनी विशेष आभार व्यक्त केले.


