Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘परिघाबाहेर’ –समाजाभिमुख कवितांचे प्रतिबिंब

Date:

स्त्रियांनी केवळ चूल आणि मूलं सांभाळायची असतात,  या मानसिकतेत आताशा खूपच फरक पडत चाललाय. विविध क्षेत्रांप्रमाणेच साहित्‍यक्षेत्रातही याचे प्रतिबिंब उमटत आहे. कवयित्री आशा अशोक डांगे यांनी नोकरी आणि कुटुंब या दोन्‍ही जबाबदा-या सांभाळून काव्‍यरचनेच्‍या क्षेत्रात ‘परिघाबाहेर’ या काव्‍यसंग्रहाच्‍या निमित्‍ताने आश्‍वासक पाऊल टाकले आहे. त्‍यांचे प्राथमिक आणि माध्‍यमिक शिक्षण औरंगाबाद येथे झाले. वडील कामगार कल्‍याण मंडळाच्‍या सेवेत होते. त्‍यामुळे मंडळाच्‍या विविध सांस्‍कृतिक उपक्रमाचा आस्‍वाद त्‍यांना शालेय जीवनापासून मिळत होता. मंडळाच्‍या ग्रंथालयाचा वाचनानुभव त्‍यांना समृध्‍द करुन गेला. वाचनाची आवड जोपासत असतांनाच महाविद्यालयीन जीवनात नाट्यस्‍पर्धांमधून आपले अभिनय कौशल्‍य  दाखवता आले. शाळेत असतांना चित्रकलेचे शिक्षक आणि कवी सुरेश धनगर यांच्‍यामुळे त्‍यांच्‍यात कवितेची आवड निर्माण झाली. इयत्‍ता सातवीतच त्‍यांनी पहिली कविता लिहीली. महाविद्यालयाच्‍या वार्षिक अंकात, औरंगाबादच्‍या दैनिक मराठवाडा, दिव्‍यमराठी, उर्मी साहित्‍य पत्रिका आदींमध्‍ये त्‍यांच्‍या कविता प्रकाशित झाल्‍या आहेत.

‘परिघाबाहेर’ या काव्‍यसंग्रहात एकूण 59 कविता आहेत. बहुतांश कविता या स्‍त्री जीवनाला केंद्रबिंदू मानणा-या आहेत. संसाराची चौकट न मोडता, संस्‍कारांच्‍या  वर्तुळात अडकूनही परिघाबाहेर जाऊन समाजव्‍यवस्‍थेवर, चाली-रितींवर आसूड ओढणा-या कवितांमुळे वाचक अंतर्मुख होतो. कवितेचा विषय, त्‍यातील सच्‍चेपणा, विचारांची स्‍पष्‍टता, सहजसोपी भाषा यामुळे कविता थेट मनाला भिडतात. स्‍त्रीमनाच्‍या वेदना मांडत असतांना कविता कुठेही अगतिक होत नाही, ती सशक्‍त, समर्थ आणि आत्‍मनिर्भरतेने प्रश्‍नांना सामोरे जाते, हीच या काव्‍यसंग्रहाची शक्‍ती आहे.

परिघाबाहेर/आशा अशोक डांगे/ गोदा प्रकाशन, औरंगाबाद/मुखपृष्‍ठ –सरदार जाधव/ पृष्‍ठ 80/ किंमत: 150 रु. (आशा अशोक डांगे- मोबाइल 9764455597)

स्‍त्री मुक्‍तीवर भाषणे ठोकणा-या पण स्‍वत:वरील कौटुंबिक अन्‍याय सहन करणा-या तथाकथित स्‍त्रीमुक्‍तीची व्‍यथाही त्‍या गांभिर्याने मांडतात. कवितेतील नायिका आपल्‍या मुलीला येणा-या संकटाची जाणीव करुन देत सावध करते, हा आशावाद नक्‍कीच प्रेरणा देणारा आहे. ‘मी फक्‍त लढले थोडं’ ही कविताही जगण्‍याची ऊर्मी देणारी आहे. ‘संकटे आली, वारही झाले, पडले थोडे, दुखावलेही थोडे.. मी फक्‍त केले एवढे.. मी मात्र जगले केवढे.. मी मात्र जगले सारे..’

कोणताही धर्म असला तरी स्त्रियांचे प्रश्‍न जवळपास सारखेच आहेत. ‘स्‍त्रीधर्म’ या कवितेत त्‍या म्‍हणतात, ‘तिला जपावा लागतो आणि जगावा लागतो प्रत्‍येकच धर्म’ ती निरपेक्षपणे पाळते.. शिकवण बुध्‍दांची.. अपेक्षा दु:खाचे मूळ कारण आहे.. येशूची करुणा मनात जागवून तिला जाळणा-यांना, जीव    घेणा-यांना माफ कर म्‍हणते. श्रीकृष्‍णाची शिकवण लक्षात ठेवून ‘कर्म करते, फळांची अपेक्षा न ठेवता… कारण तिचा एक धर्म आहे ‘स्‍त्रीधर्म’.  तिच्‍या भवतालचं  जग मात्र नेहमीच विसरतं स्‍वत:चा मानवधर्म  तिच्‍याकडे स्‍त्री म्‍हणून पहातांना..’ अशा शब्‍दांत त्‍या मनातील खंत व्‍यक्‍त करतात. स्त्रियांकडे सृजनाचे अनेक आविष्‍कार करण्‍याचे सामर्थ्‍य असून याची तिला जाणीव झाल्‍याने तिने कात टाकल्‍याचेही त्‍या ठामपणे अधोरेखित करतात.

कवयित्री आशा अशोक डांगे या शिक्षिका आहेत. शिकविणे हा धर्म असला तरी व्‍यक्‍तीगत जाणीवांचा प्रभाव वागणुकीवर पडत असतो. शिक्षीका आणि कवयित्री या नात्‍याने विद्यार्थ्‍यांच्‍या मनोभूमिकेवरही त्‍यांचे विचारमंथन चालते. निरागस चेहरा असलेले, उद्याचे भविष्‍य असलेले विद्यार्थी  पहातांना मन कधी-कधी खिन्‍नतेची खोल पातळी गाठू पहाते, पण त्‍याचवेळी  एखादा निरागस चेहरा नवचैतन्‍य निर्माण करुन आशा जागवतो… शाळेत शिकवतांना विद्यार्थ्‍यांचे जीवन जवळून अनुभवतांना त्‍यांचे संवेदनशील मन अस्‍वथ होतेच, पण उद्याची आशाही पल्‍लवीत करते.

हर्षाचा झोका, मनपाखरु, सखे फूल तू, रिमझिम, वळीव, पाऊस, ओंजळ, हिंदोळ्यावर, एकांत या सारख्‍या कवितांमधून प्रेमभावना आणि निसर्ग डोकावत असला तरी त्‍यात सहजता आहे. ‘भिजव सारा गाव…’ मधील भावना देवाला साद घालणारी आहे. जिथे मानवी प्रयत्‍न तोकडे पडतात, तिथे ‘देव’ ही संकल्‍पना उदयास येते. या कवितेतील देवाला घातलेले साकडे हे स्‍वत:च्‍या कल्‍याणासाठी नसून समस्‍त मानवजातीसाठी आहे, हे विशेष.

‘परिघाबाहेर’ या काव्‍यसंग्रहातील कवितांचा मूळ गाभा भावस्‍पर्शी असल्‍याने सामाजिक प्रश्‍नांबरोबरच मानवी संवेदनाचे भेदक प्रतिबिंब त्‍यात पडलेले दिसते, म्‍हणूनच या कविता समाजाभिमुख ठरतात.

परीक्षक : राजेंद्र सरग -9423245456

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...