वाढता वाढता वाढे…लॉकडाऊन हा (लेखिका-पूर्णिमा नार्वेकर)

Date:

14 एप्रिलला लॉकडाऊन संपेल की नाही या शंकेचं निरसन एकदाचं झालं. मुखमंत्री संवाद साधणार म्हटल्यावर थोडीबहुत कल्पना आली होती आणि अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात लॉकडाऊन पुन्हा 30 एप्रिलपर्यंत वाढवला गेला. क्रमाक्रमाने लॉकडाऊन वाढवत गेल्याने आपल्या सगळ्यांच्या मनाची तयारी झाली आहे की अजून काही दिवस, महिने तरी घरीच बसावे लागणार आहे. त्याप्रमाणे आता पुढे घरी बसून काय काय नवीन उद्योग करायचे आणि त्याचं प्लॅनिंग कसं काय करायचं याचा ऊहापोह जिकडेतिकडे सुरूही झाला आहे. खरं तर एप्रिल महिना म्हणजे मुलांच्या परीक्षा संपून बाहेरगावी किंवा कोकणात जाण्याचा काळ. दरवर्षी या काळात सुट्टीचं सर्वत्र जोरदार प्लॅनिंग सुरू असतं. 10-12वीची परीक्षा आधीच संपल्यामुळे बरीचशी गर्दी बाहेर पांगली असते. मात्र यावेळी सगळंच चित्र पालटलं आहे. ट्रिपचं प्लॅनिंग नाही, बुकिंग नाही, ब्यागा भरणं नाही की खरेदीही नाही. हो ना, यातलं काही काही सुद्धा नाही. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला तेव्हाच पालक तसेच मुलांच्या मनाची तयारी झाली होती की यावर्षी आपल्याला मे महिन्यात कुठेही जाता येणार नाही…पुढे बघू, पावसाळी पिकनिक आहेच की! एकीकडे मुलाबाळांबरोबर स्वतःची मानसिक तयारी घरातले करत आहेत तर दुसरीकडे प्रवासी कंपन्यांची अवस्था अक्षरशः वाईट आहे. एप्रिल, मे काय किंबहुना पुढील काही महिने या सेक्टरला याची झळ सोसावी लागणार आहे. ज्यांचे अगोदर बुकिंग झाले होते ते सगळेच आता कॅन्सल झाले आहे. ते नुकसान आर्थिकदृष्ट्या फार मोठे आहे. करोनाच्या भीतीने परदेश प्रवासच काय पण जवळपासही कुठे फिरायला जाण्याच्या मनस्थितीत कुणी नसणार. त्यादृष्टीने सगळेच टूर्स-ट्रॅव्हल्सवाले याचं गणित मांडायला बसले आहेत. एका नावाजलेल्या ट्रॅव्हल कंपनीतील माझ्या मैत्रिणीने सांगितले, ‘आधीच आमच्या कंपनीचा टर्नओव्हर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी निम्म्यावर आला होता आणि त्यात ऐन सिझनच्या वेळचे मार्च-एप्रिलचे सगळे बुकिंग झालेले प्रवाशांचे पैसे परत करावे लागले. आता पुढील काही महिने परदेशवारीचे बुकिंग होणे कठीण आहे. आमच्या कंपनीत तर कर्मचारी कपात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नोकरी जाते की राहते याची टांगती तलवारच आहे म्हणा ना…’ काही प्रवासी कंपन्या आपल्या नेहमीच्या प्रवाशांच्या संपर्कात आहेत. असेच एक म्हणजे ‘उन्नयन टूर्स’चे प्रभुदेसाई. ‘उन्नयन टूर्स’च्या प्रभूदेसाईंनी मात्र या परिस्थितीत एक अनोखा पर्याय शोधून काढला आहे. उन्नयन टूर्सचे यू  टयूब चॅनल सुरु करून त्या व्हिडिओची लिंक व्हाट्सऍपवर पाठवतात.  अशाप्रकारे व्हाट्सऍपवर त्यांच्या हटके पर्यटन स्थळांची व्हिडीओ क्लिप पोस्ट करून त्या निमित्ताने ते त्यांच्या पर्यटकांशी संवाद साधताहेत. चला कुठे जायला तर मिळणार नाही पण व्हिडीओ क्लिप पाहून मनाने तर त्या जागी / ठिकाणी पोहोचता येईल की! घरबसल्या महाराष्ट्र दर्शन ड्रोनच्या नजरेतून…ही पोस्टही व्हाट्सऍप ग्रुपवर फिरते आहे.

या लॉकडाऊनच्या निमित्ताने वेगवेगळ्या कल्पना आकार घेऊ लागल्या आहेत. बऱ्याच जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ चालू आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केले आहे की आतापर्यंत जे ‘वर्क फ्रॉम होम’ करत नसतील आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’ करावे. हल्ली झूम किंवा इतर व्हिडीओ कॉलिंग ऍपच्या माध्यमातून सकाळी काम, दुपारी फ्रेंड्सचा ग्रुप तर रात्री नातेवाईक अशी दिवसाची आखणी असते.  या सर्वांसोबत गप्पा मारण्यात वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही. बाकी दूरदर्शनवरील रामायण, महाभारत, सर्कस, बुनियाद आदी जुन्या मालिका आहेतच मनोरंजन करायला. विवाहित पुरुषांसोबत तर तरुण मंडळींचाही किचनमध्ये शिरकाव झाला आहे. कुठलीशी रेसिपी करण्याची क्रेझ म्हणून का होईना हा बदल स्वागतार्ह आहेच की. दोन कॉमन रेसिपीज सध्या स्टेटसवर, फेसबुकवर, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत, त्या म्हणजे पास्ता आणि डलगोना कॉफी. (लॉकडाऊन संपल्यावर एखाद्या मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात कांदे-पोह्यांऐवजी पास्ता आणि डलगोना कॉफी मिळाली तर नवल वाटायला नको!) वेळ घालविण्याचे विविध पर्याय आता उपलब्ध आहेत. काय विरोधाभास पाहा…मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर ‘वेळ कसा घालवायचा’ या विवंचनेत असणारे आता ‘वेळच मिळत नाही’ असं म्हणू लागलेत. घरीच राहायचं आहे आणि तरच आपण सुरक्षित राहणार आहोत. पंतप्रधानांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधला आणि लॉकडाऊन 3 मेपर्यंत असणार, असं स्पष्ट केलं. त्याचबरोबर करोना विरुद्धच्या लढ्यात 7 गोष्टींसाठी सहकार्य मागितले आहे. आपण सर्वांनीच निर्धार केला पाहिजे आणि पंतप्रधानांनी सांगितलेल्या सप्तपदीचे पालन केले पाहिजे. तरच वाढत जाणारा हा लॉकडाऊन लवकरात लवकर संपविण्यात आपण यशस्वी होऊ.

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...