अजुनी घरीच राहायचे आहे…(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर )

Date:

मराठी नववर्षाची(चैत्र मासारंभ) सुरुवात चोरपावलाने आणि किंचित तणावात झाली खरं तर. दरवर्षी सारखा उत्साह कुठेच दिसत नव्हता. त्याला कारणही तसंच होतं म्हणा…कारण आदल्या दिवशी म्हणजेच २४ मार्चला पंतप्रधानांनी जाहीर केले होते की आता लॉकडाऊन हा ३१ मार्चपर्यंत नव्हे तर पुढे २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत असेल. ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन तर अजून आठच दिवस काढायचे आहेत ना या विचारात असणाऱ्या सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला. कारण गंभीर होते म्हणून लॉकडाऊनची मुदत पुढे २१ दिवस वाढवण्यात आली. स्वागतयात्रा नाही, देऊळ सुद्धा बंद, तोरण नाही…अशा वातावरणात कुणाच्या घरीही जाण्याची सोय नाही, मग काय व्हाट्सएपवर आणि फोनवर शुभेच्छा देण्यात समाधान मानावे लागले. त्यात एक मन निववणारी आणि चांगली बातमी मात्र ऐकायला आली ती म्हणजे मुंबईत ८ करोनाबाधित रुग्ण बरे झाले, तर पुण्यात ज्या रुग्णांना सर्वप्रथम करोनाचा संसर्ग झाला होता, ते दाम्पत्यही बरे होऊन घरी गेले. होळीच्या दिवशी रुग्णालयात ऍडमिट झालेले हे दाम्पत्य गुढी पाडव्याला बरे होऊन आपल्या घरी परतले. खरंच त्यांच्यासाठी तो दिवस आनंदाने सण साजरा करण्यासारखा असणार.
परदेशात राहणाऱ्या आप्तेष्ट आणि मित्रमंडळींना फोन करून शुभेच्छा देताना तिथल्या परिस्थितीची थोडीफार माहिती मिळाली. बऱ्याच जणांनी २ ते ३ महिन्यांचे सामान भरून ठेवल्याचे सांगितले. टिश्यू पेपर, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, सोप, मास्क या वस्तूंची तर खूपच टंचाई झाली आहे. माझ्या सिंगापूरच्या मैत्रिणीने-केतकीने सांगितलेली माहिती तर मन विषण्ण करणारी होती. तिकडे भारतीय वस्तू, अन्नधान्य एवढेच नाहीतर भाज्याही मिळेनाशा झाल्यात. ‘रोज गरम पाण्यात हळद टाकून पाणी पीत जा’ हा सल्ला मी तिला दिल्यावर ती म्हणाली, ‘हळद तर मॉलमधून कधीच गायब झाली आहे. माझ्याकडे थोडीच आता शिल्लक आहे, ती मी पुरवून पुरवून स्वयंपाकासाठी वापरते आहे.’ तिने सांगितलेली अजून एक माहिती मन हेलावून टाकणारी होती. _तिच्या ऑफिसमधील एका सहकाऱ्याची दोन मुले कॅनडाला शिकायला गेली आहेत. सध्या तिकडील युनिव्हर्सिटी बंद झाल्या आहेत आणि हॉस्टेलही रिकामी करायला सांगितले गेले. मग आता ती मुलं जाणार कुठे?? कारण सिंगापूरद्वारे हवाई मार्ग बंद झाला. त्यांना भारतात परत येता येईल का ते बघितले तर भारतानेही आपले हवाई मार्ग २२ मार्चच्या सुमारास बंद केले. आता कुठे तिकडेच त्यांना पी. जी. म्हणून स्वतःची सोय करावी लागणार आहे. मुलांच्या घरच्यांची अवस्था पाहवत नाही._ हे सर्व ऐकून खूप वाईट वाटले.
आपल्या इथे लॉकडाऊन २१ दिवस वाढविल्यामुळे बऱ्याच सोसायट्यांनी स्वतःहून सुरक्षितेसाठी काही नियम बनवलेत. सोसायटीमध्ये इस्त्रीवाला, दूधवाला, किराणा सामानवाला…थोडक्यात काय तर बाहेरील इतर कुठल्याही व्यक्तीला सोसायटीत प्रवेश नाही. आम्हीसुद्धा आमच्या सोसायटीत हे सर्व नियम लागू केलेत. इतकेच नाही तर लिफ्टची बटणं आणि हॅण्डल्स दिवसातून ४-४ वेळा सॅनिटाईझ करत आहोत. गेटजवळच सॅनिटायझरची बाटली ठेवली आहे. बिल्डिंगमधील रहिवाशांनी बाहेरून आल्यावर पहिल्यांदा सॅनिटायझर लावून मगच प्रवेश करायचा आहे. याखेरीज आम्ही पूर्ण बिल्डिंगला पेस्ट कंट्रोलच्या माणसांकडून सॅनिटाईझ करून घेतले आहे. आमच्या ओळखीतील राजेश भाईंनी एक सामाजिक उपक्रम राबवला आहे. ते रोज सकाळी पाण्याच्या बाटल्या, केळी आणि बिस्कीटे घेऊन गाडीने निघतात आणि बंदोबस्तात असलेले पोलीस, सफाई कर्मचारी तसेच गरजूंना याचं वाटप करतात. तसेच रोज रात्री ५० कप तरी चहा घेऊन ते आणि त्यांच्या पत्नी नीता असे दोघे जण जातात. माझ्या नवऱ्यालाही त्याच्या एका गारमेंट बनविणाऱ्या मित्राने कापडी मास्क दिले आहेत. त्यांचं वाटप माझा नवरा परेश आणि मुलगा ओमकार हे पोलिसांना आणि गरजू लोकांना करत आहेत.
या सगळ्यांत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एरवी फक्त सकाळी ७ वाजेपर्यंत ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आता रहदारी आणि माणसांची वर्दळ कमी असल्यामुळे (जवळजवळ शून्य असल्याने) दिवसभर ऐकू येतोय. मी ज्या ठिकाणी राहते तिकडे बऱ्यापैकी झाडी असल्याकारणाने हे दुर्मीळ क्षण रोज अनुभवायला मिळताहेत! खिडकीतुन निरीक्षण केले की बरेच पक्षी मुक्तपणे बागडताना दिसताहेत. चिंचेच्या, अशोकाच्या झाडावर सतत चालू असलेली खारूताईची लगबग बघून खूपच मौज वाटते आहे. या पक्ष्यांच्या किलबिलाटात सकाळी १० नंतर अजून एका आवाजाची भर पडते ती म्हणजे घराघरांतून येणारी कुकरची शिट्टी. गम्मतच असते ना…काही कुकरच्या शिट्ट्या या फूसफूस करत एकदम वर वाफ येऊन वाजतात तर काही थोडा वेळ हलतडुलत, झुलत राहतात आणि मगच वाजतात. तुम्ही सुद्धा हे स्वतःच्या घरी अनुभवून बघा.
टीव्हीवर हल्ली सीरिअलचे रिपीट एपिसोड दाखवत आहेत, बाई गं तेच तेच तरी किती वेळा बघायचे. डीडी नॅशनल चॅनलने मात्र नामी शक्कल लढवली आणि पूर्वी लोकप्रिय झालेल्या रामायण, महाभारत, सर्कस…या सिरीयल्स पुन्हा दाखवायला सुरुवात केली आहे. सह्याद्री चॅनेल सुद्धा ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ मालिका पुन्हा दाखवणार आहे. बातम्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्या न्यूज चॅनल्सवर सतत त्याच त्याच बातम्या…कोरोना कोरोना कोरोना…नुसता कंठशोष चालू असतो. काही ठिकाणी भडकपणाच अधिक दिसून येतो. तर महत्त्वाचं हेच की सध्या खूप वेळ आहे आपल्याकडे आणि त्याचा सदुपयोग करायचा आहे आजूबाजूच्या अनेक गोष्टींच्या सूक्ष्म निरीक्षणातून. रोजच्या धावपळीत या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. आता सक्तीचा वेळ आपसूक मिळालाच आहे तर खिडकीतून दिसणारे बाहेरील जग आपण अनुभवू शकतो. सतत बातम्या ऐकून येणारे नैराश्य आणि उदासीनता कुठच्या कुठे पळून जाईल, मन निवांत होईल. कल्पकतेने एखादी गोष्ट करूया. वाचन, लिखाण किंवा जी गोष्ट आवडत असेल ती करूया, छंद जोपासूया…कारण अजूनही घरीच राहायचे आहे…

लेखिका -पूर्णिमा नार्वेकर, दहिसर
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...