आज दिवस तुमचा समजा (लेखिका-पूर्णिमा नार्वेकर)

Date:

 

करणने वर्गात एंट्री केली तीच एखाद्या हिरोसारखी. आपल्याच मस्तीत छान ऐटीत तो वर्गात चालत आला…आपल्या जागेवर जाऊन बसला अन् कारंडे बाई आणि आमच्याकडे बघून हसला. खोडदे शाळेतील ही घटना. या खेपेस आम्ही वाड्यातील अतिदुर्गम अशा भागातील शाळांना भेट द्यायचे ठरवले होते. त्याप्रमाणे आधी वडपाडा या शाळेत जाऊन आलो होतो. आणि आता तिथूनच सुनीता कारंडे बाई शिकवत असलेल्या खोडदे शाळेत येऊन पोहोचलो. वाटेत बाई त्या शाळेबद्दल माहिती सांगत होत्या. अतिदुर्गम भागातील या शाळा. या शाळेत कोणीही शिक्षक स्वतःहून बदली मागत नाही कारण येण्याजाण्याला सहज वाहन नाही. आणि रस्त्यापासून सामसूम असं एक किलोमीटरभर चालत जावे लागते. या शाळेत बदली म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटावी. खोडदेच्या शाळेत कोणी यायला का धजत नाही, याचा प्रत्यय शाळेत पोहोचेपर्यंत आम्हालाही आला. भोईर सर मुलींना स्कॉलरशिपच्या सराव परीक्षेसाठी गारगावला घेऊन गेले होते. वर्गात मुलं आमची वाट बघत बसली होती. तर काही मुलं बाहेर उभी होती. बाईंना बघून सगळ्यांनी वर्गात धूम ठोकली आणि चटचट आपापल्या जागेवर जाऊन बसले. बाईंनी वर्गावर नजर फिरवल्यावर त्यांच्या लक्षात आलं की करण कुठे दिसत नाही. बाईंनी विचारलं, “करण आला नाही का शाळेत?” त्यावर एका मुलानेच चटकन उत्तर दिलं, “आला व्हता पण भांडण झालं म्हणून घरी गेला.” मग बाईंनी त्याला बोलवायला एक मुलाला पाठवले आणि ५-७ मिनिटांतच करणने आपल्या स्टाईलमध्ये वर्गात एंट्री केली. पहिलीत शिकणारा करण मस्तीखोर, हसतमुख आणि हुशार. त्याच्या येण्याने सर्वच खुश झाले. नेहमीप्रमाणे आम्ही स्वच्छता किटचे वाटप केले. आजूबाजूला निरीक्षण केल्यावर दिसून आले की वर्ग सुबकपणे सजविला होता. तसेच स्वच्छ आणि प्रसन्नही वाटत होता. मुलांनी झाडाची पानं आणि नदीतील दगडही छान रंगवले होते. मुलांशी संवाद साधल्यावर त्यांच्यातील इतर कौशल्यांचीही माहिती मिळाली. खरे तर त्यांचे जेवण आले होते पण आमच्याशी गप्पा मारण्यात त्यांना त्याचा विसर पडला होता. बाईंनी आठवण करून देताच सगळी जेवायला पळाली. वाड्याजवळील इस्कॉनच्या संस्थेतून मुलांना रोज जेवण येते. दुसऱ्या वर्गात त्यांची जेवणाची तयारी झाली होती. ‘वदनी कवळ…’ पाठोपाठ ‘बाई जेवायला या’ असेही म्हणून झाले होते. पण बाई आमच्याशी बोलत होत्या. बाई आल्याशिवाय मुले जेवायला तयार नव्हती. आम्ही सगळेच गेलो बाईंबरोबर. ‘आता तरी जेवा’ असं बाईंनी सांगितलं तरीही मुलं जेवायला तयार नाहीत. मग बाईंनी एक घास खाल्ला आणि त्यानंतरच मुलांनी जेवायला सुरुवात केली. सगळे एक वर्तुळ करून शिस्तीत जेवायला बसले होते. अतिदुर्गम भागातील खोडदेची शाळा असली तरी टापटीप आणि शिस्तबद्ध. याचे सारे श्रेय येथे याआधी असलेले शिक्षक दीपक शनवारे यांचे आहे; ज्यांना यावर्षीचा जीवन गौरव शैक्षणिक मासिकाचा पुरस्कार  मिळालाय. दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातून संघर्षाचे धडे गिरवत, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने स्वतःचा ठसा उमटवत त्याची दखल घ्यायला लावणारे हे ध्येयवादी शिक्षक. जवळ जवळ ७-८ वर्षं या खोडदे शाळेत होते आणि एक शिस्तबद्ध शाळा म्हणून तिला घडवले. आणि त्यानंतरचे धिंडा सरही. त्या दोघांच्या नीटनेटकेपणाचे आणि शिस्तीचे धडे आजही गिरवले जातात. अर्थात हे सांगताना बाईंच्या चेहऱ्यावर या शिक्षकांविषयी अभिमान आणि आदर दिसून येत होता. आजही त्याच शिस्तीत ही शाळा आणि शाळेचे कामकाज चालते. बाई शाळेविषयी माहिती सांगत असताना मुलांचे जेवण झाले होते. बाईंनी विचारले, ‘तिळमाळच्या शाळेत सगळे येणार ना?…’ त्यासरशी सर्वानी एका सुरात ‘हो’ म्हटले आणि सर्वजण हात व जेवणाचे ताट धुवून तयार झाले. त्यानिमित्ताने मुलांची परिसर अभ्यासची सहलही होऊन जाईल, असं बाई म्हणाल्या.

तिळमाळची शाळा. अवघे ५ विद्यार्थी असलेली ही शाळा! या शाळेबद्दल बाईंनी आम्हाला आधीच विचारले होते…’नदीचे पात्र पार करून पलीकडे शाळा आहे. तुम्ही येणार ना? रस्ता चांगला नाही. चालतच जावे लागणार आहे.’ आम्हीही होकार दिला. खोडदे शाळेपासून आमची सहलच निघाली म्हणायला हरकत नाही. जोडी जोडी करून मुलांसोबत आम्हीही जंगलाच्या वाटेने चालत होतो. पुढे नदीच्या पात्राला जास्त पाणी नव्हते. नदी पार केली तरी पण अजून शाळा कुठेच दिसत नाही. त्यावर कळले की आता टेकडी पार करून जायचे आहे. हे ऐकून मात्र पोटात गोळा आला. कारण पूर्ण रस्ता दाट झाडीतून आणि डोंगराळ होता. त्या मोठमोठ्या  खडकांवर पाय ठेवून वाट काढत जाणे भलतेच कठीण गेले आणि भीती सुद्धा वाटली. पूर्ण डोंगर पार करेपर्यंत खूपच दमछाक झाली. मी आणि गौरी तर पार थकून गेलो. पण आमच्या बरोबरची मुलं मस्त मजेत पटापट उड्या मारत बाईंशी गप्पा करत, वाटेत कुठे बोर कधी कुठे दगड गोळा कर अशी बागडत चालली होती. त्या मुलांपैकीच सरिता आणि जयश्री मात्र आमची काळजी घेत आमचा हात धरून चालत होत्या. तिळमाळची शाळा कधीच सुटली होती पण ३ मुलं  आमची वाट आतुरतेने पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आमचा थकवा कुठच्या कुठे पळाला. उरलेली दोन मुलं मात्र बोरं काढायला रानात निघून गेली होती. स्वच्छता किट बरोबरच त्या मुलांना आम्ही खाऊही दिला. सगळे मस्त मजा करत खाऊ खात होते. परत येताना मात्र आम्ही दुसऱ्या बऱ्यापैकी चांगल्या रस्त्यानं आलो, आणि पाहिलं तर त्या ठिकाणी नदीला पाणी होतं. मुलांची तर मजाच झाली आणि बाईंनी होकार देताच सगळ्यांनी नदीत मस्त डुबकी मारली. काही जण खेकडे पकडत होते, तर मुली रंगविण्यासाठी गुळगुळीत गोटे गोळा करत होत्या. मस्त यथेच्छ नदीत डुंबून झालं होतं. या सर्वांत करणची जास्त मजा चालली होती. आम्हीही त्यात सहभागी झालो होतो. अशी परिसर अभ्यासाची सहल मी, ओंकार, संपदा, आशिष आणि गौरी पहिल्यांदाच अनुभवत होतो. खोडदे शाळेत परत येताना वाटेत दिसणाऱ्या झाडांबद्दल, रानभाज्यांबद्दल मुलं आम्हाला माहिती सांगत होती. आता मात्र प्रचंड भूक लागली होती. जयश्रीच्या घरी जेवणाची सोय केली होती. बाहेर मुलं तिथे कोंबडी पकड, बकरी पकड, तर कुणी झाडाच्या झावळीचे पदर कातून छान छान आकार बनवत होती… करण तर मस्त झाडावर चढून उलट टांगून बसला होता. आता आमची निघायची वेळ झाली होती कारण ओंकारचे शिक्षकांसाठीचे ट्रेनिंग सेशन दुसऱ्या ठिकाणी सुरु होणार होते. सगळ्यांचा निरोप घेऊन निघणे थोडे जडच गेले. सरिता अजूनही माझा हात धरून होती. कारंडे बाईंनी मुलांना सांगितले की, ओंकार दादा आणि सगळे पुन्हा नक्की येणार आहेत. मुलांसाठी आणलेले कपडे त्यांना दिले आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. आमच्या गाडी पाठी ती दिसेनाशी होईपर्यंत मुले धावत आणि आम्हाला टाटा करत पळत होती. आम्ही मागे वळून त्यांना पाहत होतो आणि टाटा करत होतो. हा पूर्ण दिवस या मुलांसाठी आणि आमच्यासाठी कवी भा. रा. तांबेंच्या कवितेप्रमाणे अद्भुत आणि अविस्मरणीय होता-

या बालांनो या रे या

लवकर भर भर सारे या

मजा करा रे ! मजा मजा

आज दिवस तुमचा समजा

-पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

  भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.), 

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...