मृत्‍यू – एक निरंतर प्रवास (लेखिका – पूर्णिमा नार्वेकर)

Date:

आई गेली…पण चेहरा नेहमीसारखाच शांत…, जातानाही तिने कुणाला त्रास दिला नाही, तिची काही सेवाही करायला लागली नाही’, प्रज्ञा परेशला सांगत होती. मला मात्र हे ऐकता ऐकता माझ्या आजी-आजोबांच्या निधनाचा प्रसंग आठवला…

माझे आजोबा गेले तेव्हा मी साधारण सोळा वर्षांची होते. आजोबा दिसायला उंच, काटक, करारी मुद्रा असे एकंदर प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्र्याऐंशी वयाचे असताना निधन पावले. पाय घसरुन पडण्याचे निमित्त झाले. डॉक्‍टरांनी सांगितल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करावे लागले. तशी आजोबांची हॉस्पिटलला जाण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण घरच्यांनी समजूत काढल्यानंतर ते तयार झाले. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, प्लॅस्टरमध्ये घालण्यात आला. वयोमानाने ऑपरेशन शक्य नव्हते पण नंतर आरोग्याच्या काही तक्रारी अजून वाढत गेल्या.  हे सगळे चालू असताना माझी आजी अत्यंत संयम बाळगून होती,आम्हा सगळ्यांना धीर देत होती. खरे तर तिला धीराची जास्त गरज होती. बाबा-काका-आई सगळ्यांनी आपापल्या परीने आजोबांची सेवा केली, पण नियतीच्या पुढे कुणाचेही चालत नाही. महिन्याच्या आतच आजोबा गेले. तो दिवस मला अचूक आठवतो. बाबा पहाटे पहाटे घरी आले.’काका गेले’ (बाबा-काका आजोबांना’काका’ या नावाने हाक मारायचे) म्हणून सांगितले. आजीची मुद्रा अत्यंत शांत होती. कुठेही आक्रोश, मोठ्याने रडणे नाही. तिने सांगितले की, आता एवढ्या पहाटे कुणालाही कळवू नका…सकाळ होऊ दे,मग सांगा. नाहीतरी मृतदेह मिळेपर्यंत वेळ लागणारच, उगाच लोकांना आतापासून उठवून सांगण्यात काही अर्थ नाही. आम्हालाही *बजावले* की माणसं जमायच्‍या आत उठून चहा-बिस्कीट खाऊन घ्या. आजही हे सगळं आठवलं की अंगावर काटा येतो. एवढा संयम आजीमध्ये आला कुठून? जिचा नवरा या जगात नाही, तीच सगळ्यांना धीर देते आहे. खरंच यासाठी प्रचंड आत्मिक शक्ती लागते आणि ती आजीकडे होती. आजोबांच्या बाबतीत एक योगायोग म्हणजे त्यांचा जन्म संकष्ट चतुर्थीचा आणि मृत्‍यू झाला तेव्हाही *अंगारक* योग होता. आजोबा निर्वतल्याचे कळल्यानंतर ठिकठिकाणाहून माणसे जमली. आजोबांची जोडलेली माणसे तशी बरीच होती. खूप लोकं आली होती. दुपारी आजोबांचा मृतदेह ताब्यात मिळाला आणि प्रथेप्रमाणे विधी केले. आजी शांत मुद्रेने त्यांच्याजवळ बसून होती. स्वत:च्या हाताने तिने बांगड्या काढल्या, कुंकू पुसले आणि मंगळसूत्र काढून दिले. या सगळ्या प्रक्रियेत कुठेही आक्रोश नव्हता की छाती बडवून रडणे नव्हते. तिने स्वीकारले होते की, मृत्यू म्हणजे संपणे नाही तर तो’प्रवास’ आहे…एका जन्माचा दुस-या जन्माकडे! त्यासाठी त्यांना आपण निवांतपणे निरोप दिला पाहिजे, तरच तो आत्मा शांत होणार आणि शरीर गेले तरी आत्मा आहे ना…तो कुठे जातो? तो तर अमर आहे. मग रडून, खूप आक्रोश करुन घेण्यापेक्षा शांतपणे तो प्रसंग *निभावून नेला* पाहिजे. तो प्रसंग आम्हीही त्याप्रमाणेच अनुभवला की आजोबांचा हा प्रवास सुरू झाला…एका जन्माकडून दुस-या जन्माकडे. मृत्युची भीषणता, त्यातील भयंकरता, अकारण भीती कमी झाली.

      तीन महिन्यांनी आजीही आम्हाला सोडून गेली. केवळ ताप येण्याचे निमित्त झाले. बहुदा तिला तिचे मरण जवळ आहे,हे कळून चुकले होते की काय कुणास ठाऊक! कारण सहदेवकाकांना तिने साधारण ती जाण्याच्या एक महिन्याअगोदर सांगितले होते, ‘तुझ्या बायकोला (पार्वतीला) बघायचे आहे, तर बोलव तिला मुंबईला…’ आजीचा जेवढा बाबा-काकांवर तेवढाच सहदेवकाकावर जीव. वयाच्या 12 व्या वर्षांपासून म्हणजे साधारण 1958 सालापासून तो आमच्याकडे कामाला होता. जवळजवळ50 वर्षं तो आमच्या सोबत होता. सहदेवकाका व त्याच्या बायकोवर आजीचा भारी जीव. खडे असलेल्या अशा सोन्याच्या दोन जोड कानातल्या कुड्या आजीकडे होत्या. सहदेवकाकांची बायको जेव्हा आजीला भेटायला आली, तेव्हा त्या कुडाची एक जोड आजीने तिला दिली. केवढं मोठं मन होतं तिचं! हल्ली नोकरमाणसांना जी वागणूक दिली जाते ती बघितली की हटकून आजी आठवते. तिने सहदेवकाका व त्याच्या कुटुंबावर आपल्या मुलाप्रमाणेच प्रेम केले. थोड्या दिवसांनी सहदेवकाका काकूला सोडायला गावी गेला आणि इकडे अचानक आजी तापाने फणफणली. तसा आठएक दिवसांनी तो परत येणारच होता. नेहमीचा तो रविवारचा परत यायचा आणि आला की संध्याकाळी घरी येऊन सांगून जायचा, ‘उद्यापासून कामावर हजर होईन’.यावेळीही रविवारी तो गावाहून आला मात्र घरी आला नाही. इकडे आजीची चौकशी सुरू झाली…सहदेव आला, मग मला भेटायला आला कसा नाही…? ‘काही कामामुळे आला नाही पण उद्या सकाळी येणार’, असे घरच्यांनी सांगितले. नित्यनेमाने सोमवारी सकाळी पावणेसातला तो चहा प्यायला हजर झाला. आजी डोळ्यांत प्राण आणून त्याची वाट बघत होती. त्याला बघून खूश झाली,काकूची चौकशी केली. सहदेवकाकालाही तेव्हाच कळले की आजीला ताप आहे. तोही तिच्या उशाजवळ बसला, त्याने तिला उठवून बसवले, चहा पाजला. आजी त्याला म्हणाली, ‘चला, सहदेव तू आलास…आता काळजी नाही. त्याच्या मांडीवर झोपण्याची तिने इच्छा व्यक्त केली. थोड्या वेळाने तो आजीचे डोके उशीवर ठेवायला गेला, पण आजी केव्हाच कायमची झोपली होती…कधीही परत न उठण्यासाठी. आणि तिची शांत, संयमी,हसरी मुद्रा…मरण इतके सहजही असू शकते! कुठेही जीवाची तडफड नाही. खरंच मृत्युला खऱ्या अर्थाने तिने स्‍वीकारले

होते. आत्म्याचा एका जन्मातून दुस-या जन्माकडे चाललेला एक निरंतर प्रवास…

  पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...