“पपांना म्हणजेच माझ्या सासऱ्यांना मुंडीचं मटण खायचं होत. शेवटी शेवटी सर्व काही खावंस वाटतंच माणसाला; पण हे म्हणाले-नको देऊ, त्यांना त्रास होईल. तरीही मी यांचं काही ऐकलं नाही आणि सासऱ्यांना त्यांच्या आवडीचं मटण करून खायला घातलंच ” मालती सांगत होती. “यांना नाही आवडलं, मेल्यावर मग काय कावळ्याला पानात त्यांच्या आवडतं खाऊ घालणार का? त्यापेक्षा पपांना आता काय हवं-नको ते बघूया. त्यांना जे खायची इच्छा होते ते खाऊ दे.” पपा जाण्याआधीचा हा किस्सा, त्यांची आठवण निघाल्यावर मालती सांगत होती. खरंच आहे म्हणा…जिवंतपणी आपल्या माणसाला काय हवं-नको ते बघायला हवं. आधी यातना द्यायच्या आणि मेल्यावर पानाला कावळा शिवण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा, याला काय अर्थ.
पितृपंधरवडा सुरू झाला की दुपारच्या वेळी गल्लीच्या तोंडाशी, अंगणात, छतावर किंवा गच्चीवर पान किंवा वाडी ठेवून…काव काव काव…ये रे ये म्हणत कावळ्याला बोलावत आहेत, हे दृश्य हमखास पाहायला मिळतं. ‘कावळा पिंडाला शिवला’ म्हणजे आत्मा तृप्त झाला, असे मानतात. पितृपंधरवडा सुरू झाला आणि सोशल मिडियावर त्याबद्दल बरीच माहिती वाचायला मिळाली – कावळे हे निसर्गाचे साफसफाई कर्मचारी आहेत. कुठेही घाण किंवा मेलेला प्राणी दिसला की हे तातडीने हजर. सर्वत्र आढळणाऱ्या व परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या या पक्ष्याला साहजिकच असे महत्त्व दिले गेले आहे. कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागांत सर्वत्र आढळतो. जर त्या आत्म्याची कशातच वासना राहिलेली नसेल तर पटकन कावळा त्या पिंडाला शिवतो. अन्यथा तासनतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही. असं म्हणतात की, फक्त कावळा आणि कुत्रा या दोनच प्राण्यांना मृत्यू व आत्मा दिसतो. कावळ्याला पितृपक्षात एवढे महत्त्व देण्याची आणखीही बरीच कारणे आहेत. माणसांना फक्त उजेडात दिसते. मांजराला उजेडात तसेच अंधारातही दिसते. वटवाघूळ व घुबडाला फक्त अंधारातच दिसते. यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्यास मिळाली आहे, असं मानलं जातं. आज आपण एवढी वैज्ञानिक प्रगती केलेली असली आणि डोळ्याप्रमाणे लेन्स तयार केली असली तरी जीवात्मा पाहू शकलेलो नाहीत. कारण लेन्स तयार झालेली असली तरी तिच्यात ती कावळ्याची दृष्टी पाहण्यासाठीचे प्राण नाहीत.
महाराष्ट्रात पितृपंधरवड्याचे जसे महत्त्व आहे तसेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळात सुद्धा ही प्रथा आहे. एवढेच नाही तर नेपाळ, कंबोडिया, मलेशिया, चीन, जपान या आणि अशा अनेक देशांत निरनिराळ्या पद्धतीने पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणजेच ही कृतज्ञ राहण्याची भावना जगाच्या पाठीवरही एकसारखीच आहे.
आपले पितर, आपले पूर्वजच आपल्याला आशिर्वाद द्यायला येतात तर मग पितृपंधरवडा हा अशुभ का मानायचा? हे दिवसही शुभ मानायलाच हवेत की! त्या निमित्ताने मदत, दानधर्म किंवा काही सामाजिक कार्य केले तर आपले पूर्वजही आपल्याला भरभरून आशिर्वाद देतील आणि कावळ्याच्या रूपाने आलेला त्यांचा आत्माही पिंडाला नक्कीच शिवेल. जन्मानंतरचा पहिला घास काऊच्या साक्षीनं खाणाऱ्या माणसाचा शेवटचा प्रवास कावळ्याच्या उपस्थितीशिवाय अपूर्ण आहे, एवढं मात्र खरं. कधी अनवधानाने चूक झाली तर माफ करा, कायमच हातून चांगले कार्य घडावे त्यासाठी तुमचे आशिर्वाद हवेत…याच सद्भावनेने नमस्कार करून त्या आत्मरुपी कावळ्याला म्हणावे काव काव काव…ये रे ये…
©पूर्णिमा नार्वेकर ,दहिसर