बाप्पाचे विसर्जन – बदलते स्वरूप (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

पण नदीला मात्र जरूर भेट देऊया, तिथे होणाऱ्या उत्सवाचा आनंद लुटूया…फक्त नदीला प्रदूषणमुक्त करण्याचे ठरवून नदीवर येऊया” जीवित नदीच्या या संस्थेच्या कार्यकर्त्या शैलजा देशपांडे माहिती सांगत होत्या. अमोलने व्हाट्सअपवर पाठवलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवावरचा हा व्हिडिओ पाहत होते. अगदी राईट टाइमला म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी आलेला हा व्हिडिओ. नदीच्या पुनर्जीवनावर काम करणारी ही संस्था. माहितीपूर्ण आणि प्रत्येकालाच विचार करायला लावणारा हा व्हिडिओ. गणपती विसर्जन…नदीला प्रदूषित होण्यापासून वाचवणे ही काळाची गरज. सकाळचीच पेपरमध्ये एक बातमी वाचनात आली ‘लातूरमध्ये गणेश विसर्जन यंदा अशक्य, पाणीटंचाईमुळे पहिल्यांदाच कटू निर्णयाची वेळ.’…खरंच नदी काय पण आता पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्याची गरज आहे. ‘गेल्या शंभर वर्षांत देशात अथवा देशाबाहेरील कोणत्याही शहरावर पाणी नाही म्हणून गणेशाचे विसर्जन न करण्याचा प्रसंग आला नाही.’ – हेही या बातमीत नमूद केले होते. याचे गांभीर्य आपण सगळ्यांनीच ओळखायला हवे. गणपतीच्या मूर्तींची उंची, मूर्तीसाठी वापरले जाणारे रासायनिक रंग *आणि गणपती विसर्जन* बऱ्याच गोष्टी या कालानुरूप बदलत गेल्या.

विसर्जनाचे नियोजन आधीपासूनच सुरू होते खरे तर. कुठे – कुठे रस्त्याचे मार्ग त्यासाठी बंद ठेवण्यात आलेत किंवा वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे याची पेपरमध्ये आणि सोशल मीडियावरही २-४ दिवस आगाऊ बातमी येत असते. पण ती बातमी वाचून त्याचे पालन करणारे थोडकेच. याचा अनुभव गेल्या २-३ दिवसांपूर्वी आला. संध्याकाळच्या वेळेला दहिसरहून बोरिवलीला जाताना. ” ये गल्ली मे गणपती का मिरवणूक हे, दुसरे गल्ली से निकालू क्या??” (मुंबईची ही खास भाषा) रिक्षावाल्याने विचारले म्हणून आम्ही हो म्हटलं. दुसऱ्या गल्लीतही गणपतीची मिरवणूक. पुन्हा त्यातून वाट काढत काढत रिक्षा निघाली. परत घरी येताना त्याहून वेगळी तऱ्हा. मिरवणूक निघाली असल्यामुळे खूप वेळ गाड्या मिरवणुकीतील प्रतिनिधींनी थांबवून ठेवलेल्या. थोडं पुढे गेल्यावर तर एकीकडचा पूर्ण रस्ताच मिरवणुकीसाठी बंद करून ठेवलेला होता. विचारलं तर उर्मट उत्तर मिळालं “मिरवणूक जातेय तर एकाच बाजूने जा ना…”  रस्ता यांच्या मालकीचाच असल्यासारखा आव आणत होते. रस्ता अडवलाय, ज्यामुळे मागे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे, याचं त्यांना काही देणंघेणं नाही. हा अनुभव बऱ्याच जणांना विसर्जनाच्या वेळी आलेला असणार. यावर काहीही नियंत्रण नाही. काही अतिमहारथी तर सरळ बाईक आणि स्कुटर  फूटपाथवरून नेत होते. फूटपाथच्या बाजूला लहान मुलाबाळांना घेऊन बसलेल्यांना त्यामुळे उठावे लागले. रस्त्यावरून वाट काढत पुढे जाताना, हे सगळं पाहात असताना पूर्वीचे विसर्जनाचे दिवस आठवले…

“बाबा आता चार वाजलेत की…आता कधी जायचं?” दुपारपासून तयार होऊन बसलेलो मी आणि माझा भाऊ, दोघंही बाबांना प्रश्न विचारून भंडावून सोडायचो. अनंत चतुर्दशीला मिरवणूक बघायला जाण्याचा दरवर्षीचा आमचा नेम. ‘प्लाझा’ सिनेमाच्या ब्रिजवर उभं राहिलो की सगळे मोठे गणपती जाताना दिसायचे. १७१ च्या बस स्टॉपवर किंवा मागे कठड्याला लोखंडी रेलिंगला टेकून उभे राहायचो. मी, बाबा आणि माझा भाऊ निलेश. सोबत एका पिशवीत पाण्याची बाटली आणि वेफर्स. आई थोडी उशिराने आमच्यात सामील व्हायची. एक एक मिरवणूक बघताना भारी आनंद व्हायचा. बहुत करून  सायन, दादर टीटी, वडाळा, चेंबूरचे गणपती त्या रस्त्याने दादर चौपाटीकडे जायचे. साधारण संध्याकाळी ६ नंतर मोठे गणपती जायला सुरुवात व्हायची. कुठला गणपती कधी जाणार हे माहीत असायचे. डोक्यावर हांडेचे हांडे घेऊन तृतीयपंथीच्या मंडळाचाही गणपती जायचा. साधारण ७ ते ७.३० च्या सुमारास दुरून पाण्याचे कारंजे दिसू लागले की कळायचं ‘आर के स्टुडिओ’चा म्हणजेच राज कपूरचा गणपती आला. त्याची मिरवणूक बघण्यासाठी ही अलोट गर्दी व्हायची! त्याचे डेकोरेशन दरवर्षी एकच – महादेवाच्या जटेतून निघणारी गंगा आणि गणपतीची मूर्ती. त्या गंगेचे पाणी आम्हा फूटपाथवर असलेल्या लोकांच्या अंगावर उडायचे. काय भलताच आनंद व्हायचा तेव्हा. या गणपतीच्या मिरवणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे आर. के प्रॉडक्शनच्या नवीन येणाऱ्या सिनेमाचं बॅनर लावलेलं असायचं. हा गणपती गेला की गर्दी पांगायची. आम्हीही तिकडून प्रस्थान करायचो. बाहेर हॉटेलमध्ये जेवण करून परत सेनाभवन जवळ मिरवणूक बघायला उभे राहायचो. नानाचा (नाना पाटेकर) गणपती साधारण ९. ३० ते १० च्या सुमारास सेनाभवन जवळ यायचा. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक…ढोल ताशे, लेझीम आणि डोक्यावर दिवे घेऊन चालणारी माणसे अशा शाही लवाजम्यात मिरवणूक असायची. खूप उशीर झालेला असायचा मग मात्र घरी जायला निघायचो…आठवणींमध्ये हरवलेली मी गर्दीतून वाट काढत घरी कधी आले ते कळलंच नाही.

 टीव्हीवर सकाळपासूनच अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाचे थेट प्रक्षेपण चालू होते. मुंबई, पुणे कोल्हापूर, नाशिक… सगळ्याच ठिकाणांचे. नदी किंवा नैसर्गिक तलावाचा वापर टाळून कृत्रिम तलाव आणि हौद यांचा बाप्पाच्या विसर्जनासाठी उपयोग केला जातोय. पुण्यात आजही मानाच्या गणपतींना त्यांच्या क्रमानेच मिरवणुकीत स्थान आहे. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात, लेझीम खेळात, बँडच्या जोशात बाप्पा आपल्या गावी निघाले आहेत. मुंबईतही विसर्जन सोहळा बघण्यासाठी अलोट गर्दी आहे. या गल्लीचा राजा तर दुसऱ्या गल्लीचा महाराजा मोठ्या दिमाखात निघाले आहेत. ही चढाओढ कुठे तरी थांबावी असं वाटतं. गेल्या वर्षी बोरिवलीमध्ये दोन गणपती मंडळांत याच कारणावरून मारामाऱ्या झाल्याचं पाहिलं. आमच्या गणपतीची मिरवणूक पुढे की तुमच्या. एवढंच नाहीतर आपण किती मोठे हे दाखवण्यासाठी ढोल ताश्यांचा आवाजही कर्कश. त्याही पुढे जाऊन मोठेपणा दाखविण्यासाठी एका ढोल-ताशा पथकाने थोडा विराम घेतला तर वाजवण्यात खंड पडू नये म्हणून दोन वेगवेगळी ढोल-ताशा पथके एकाच गणपतीसाठी. कसली ही चढओढ आणि कशासाठी…आपण किती महान आणि मोठे दाखविण्यासाठी?… पण त्या बाप्पाच्या दरबारात सर्व भक्त सारखेच असतात, बाप्पाला राजा किंवा महाराजा न करता आपल्या सर्वांचाच फक्त बाप्पाचं राहू दे… हे या बापड्यांना कळायची सुबुद्धी दे, हेच बाप्पाला सांगावंस वाटतं. अर्थात काही चांगले बदलही झाले आहेत. आजची तरुण पिढी जागरूक होत आहे. बाप्पाला पेढे, मोदकच्या प्रसादाऐवजी आदिवासी पाड्यातील मुलांना मदत म्हणून शैक्षणिक साहित्याचा आग्रह करते आहे…चौपाटीवर निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रतिनिधी आहेत…एवढेच नाही तर विसर्जनानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किनाऱ्यावरील अर्धवट मूर्तींचे परत विसर्जन करते आहे.

मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण चालूच होते. घरबसल्या सगळ्याच ठिकाणच्या बाप्पाचे दर्शन होत होते. ढोल ताशाच्या गजरात कुठेतरी गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या… डोक्यावर टोपी, हातात पाटावर असलेली बाप्पाची मूर्ती, सोबत ४-५ माणसं हातातील टाळ वाजवत आपल्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे  आमंत्रण देत होते… ते दृश्य पाहता पाहता बाप्पासमोर आपसूक हात जोडले गेले आणि त्या गजरात मीही कधी सामील झाले ते कळलंच नाही.

गणपती बाप्पा मोरया…पुढल्या वर्षी लवकर या…

-पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...