२२ व्या वर्षातील ‘पुण्यभूषण’ पहाट दिवाळी कार्यक्रमात शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील संस्थांचा सन्मान
पुणे :
पुण्यभूषण, त्रिदल संस्थेच्या ‘दिवाळी पहाट’ च्या निमित्ताने तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांची ‘तालयात्रा’ प्रथमच पहाटे रसिकांच्या भेटीला आली !
२२ व्या वर्षातील ‘पुण्यभूषण’ पहाट दिवाळी कार्यक्रमात शताब्दी साजरी करणाऱ्या ५ संस्थांचा सन्मान ‘पक्का पुणेकर’ पुरस्काराने महापौर प्रशांत जगताप, कृष्णकुमार गोयल, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, आमदार सुभाष झांबड, नंदू नाटेकर, रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख, रोटरी क्लब पुणे मिडटाऊनचे अध्यक्ष मुकुंद कमलाकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूट, मसाप, भारत इतिहास संशोधक मंडळ, महावीर जैन विद्यालय, महाराष्ट्र मंडळ यांचा समावेश होता. श्रीकांत बहुलकर,श्री . भावे, युवराज शहा, धनंजय दामले, मिलिंद जोशी यांनी संस्थांच्या वतीने सन्मानचिन्ह स्वीकारले. पुण्याच्या प्रेमात असलेले फिनलंडचे नागरिक वेसा तोयवान यांचाही सत्कार करण्यात आला .
पुणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद दिला. मातोश्री वृद्धाश्रमातील ६० आजोबा आजींची देखील विशेष उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यभूषण फाउंडेशन, त्रिदल, कॉसमॉस बँक आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन यांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे केले होते. रांगोळ्या, पणत्या, सनई -चौघडा, वासुदेवाची स्वारी अशा वातावरणात बालगंधर्व रंगमंदिर उजळून गेले होते.
प्रास्ताविकात संयोजक डॉ सतीश देसाई यांनी २२ वर्षांचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘पुण्यभूषणची ‘पहाट दिवाळी’ हा उपक्रम २२ वर्षापूर्वी सुरु झाला आणि महाराष्ट्रात घरातील दिवाळी सार्वजनिक स्वरूपात साजरी होऊ लागली’
आपण राजकीय भाषण करणार नसल्याचे महापौरांनी सांगून ‘हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढयांना देण्यासाठी ‘पहाट दिवाळी’ कार्यक्रम उपयुक्त आहे’ असे सांगितले
मकरंद टिल्लू, गजेंद्र पवार, मुकुंद अभ्यंकर, मोहन पालेशा, डॉ. सुधीर राशिंगकर, दिलीप कुंभोजकर, सुरेश धर्मावत, संतोष पाटील, अनिकेत देसाई, रवी चौधरी उपस्थित होते .