पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार

Date:

आरोग्‍य शिक्षण हा मूळ पाया असलेल्‍या ‘माझे कुटुंब -माझी जबाबदारी’ या मोहिमेची पुणे जिल्‍ह्यात यशस्‍वी अंमलबजावणी होत आहे. तथापि, सप्‍टेंबर महिन्‍यात कोरोनाबाधितांच्‍या संख्‍येत अचानक वाढ झाल्‍याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ऑक्‍टोबर महिन्‍यात कोरोना बाधितांच्‍या संसर्गाचे प्रमाण स्थिर आहे, हे प्रमाण हळूहळू कमी होण्‍यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात सामूहिक प्रयत्‍नांतून ‘पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार’चा नारा देण्‍यात आला आहे.

            9 मार्च 2020 पासून पुणे शहर आणि परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. शासन-प्रशासन स्‍तरावर आवश्‍यक त्‍या उपाययोजना केल्या जात होत्‍या. अर्थव्‍यवस्‍थेचे चक्र सुरळीत चालू राहण्‍यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ अर्थात ‘पुनश्‍च हरि ओम’ करण्‍यात आले. ‘अनलॉक’ची प्रक्रिया टप्‍प्‍याटप्‍प्‍याने चालू असतांना नागरिकांनी स्‍वयंशिस्‍त पाळणे गृहित धरण्‍यात आले होते. तथापि, स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करुन इतरांचे आरोग्‍य धोक्‍यात आणणाऱ्या व्‍यक्‍तींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. कोरोना विषाणूबाबत अजून संपूर्णपणे माहिती नाही. त्‍यावरील लशींचे संशोधन चालू आहे. या परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, अशा उपाययोजना करणे, हाच प्रतिकाराचा खरा मार्ग उरतो. यामध्‍ये बाधित रुग्‍ण शोधणे, त्‍यांच्‍यावर लक्षणे पाहून तातडीने उपचार सुरु करणे, बाधित रुग्णांच्‍या संपर्कात आलेल्या व्‍यक्‍ती शोधणे, सहव्‍याधी रुग्‍णांवर आवश्‍यकतेनुसार उपचार करणे, संसर्गाची साखळी तोडण्‍यासाठी विलगीकरण करणे यावर भर देण्‍यात आला. हे करत असतांना कोरोनाबाधित किंवा त्‍यांच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती घाबरुन जाणार नाही, याचीही काळजी घ्‍यावी लागत होती.  पुणे जिल्‍ह्यात पहिला रुग्‍ण सापडल्‍यानंतर राज्‍याचेच नव्‍हे तर देशाचे लक्ष पुण्‍याकडे होते. संभाव्‍य धोके लक्षात घेवून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्‍यात येत होत्‍या. जिल्‍ह्यातील भौगोलिक रचना, हवामान, उपलब्‍ध साधने यांचा विचार करुन सर्व संबंधित यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. प्रसंगी कायद्याचा वापर करुन लोकांमध्‍ये आरोग्‍यविषयक शिस्‍त निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न झाला. समुपदेशनाचाही प्रयत्‍न झाला. उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींच्‍या सूचना लक्षात घेवून आवश्‍यकते निर्णय घेतले. कोरोनाचा संसर्ग रोखणे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून संबंधित यंत्रणांना निर्णयाचे पूर्ण स्‍वातंत्र्य दिले.

विभागीय आयुक्‍त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्‍त विक्रमकुमार, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्‍त श्रावण हर्डीकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी आरोग्‍य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. दिलीप कदम, आरोग्‍य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्‍यासह विविध विभागाचे अधिकारी हेही निर्णयप्रक्रियेत सहभागी होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी सामाजिक कृतीशील गटाची आवश्‍यकता दिसून आल्‍याने या गटाची स्थापना करण्‍यात आली.

            हिवाळ्याचा ऋतू, आगामी नवरात्रीचा सण, उघडण्‍यात आलेले हॉटेल-रेस्‍टॉरंट-बार या सर्व बाबी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन आणि स्‍वयंसेवी संस्‍था- संघटनांचा एकत्र कृतीशील गट स्‍थापन करण्‍यात आला. माजी आरोग्‍य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्‍या मार्गदर्शनाखाली लोकसहभाग, त्याद्वारे कोविडसंबंधी गैरसमज दूर करणे, प्रतिबंधक उपायांची योग्य अंमलबजावणी, शासन व नागरिकांमध्ये सुसंवाद आणि प्रशिक्षण व संवाद साहित्य तयार करणे अशी कार्यपध्‍दती ठरविण्‍यात आली. प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य क्षेत्र आणि सामाजिक चळवळीतील अनुभवी कार्यकर्त्यांच्‍या समूहातून अधिकाधिक लोकसहभाग मिळवण्‍यावर भर देण्‍यात आला आहे. यासाठी 1) लोकसहभाग 2)  सार्वजनिक आरोग्य आणि 3) माहिती-शिक्षण-संवाद (आयइसी) या विषयांवरील तीन उप गट स्‍थापन करण्‍यात आले आहेत.

            पुण्यासाठी समांतर अभियान का? याबाबत माजी आरोग्‍य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले की, सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ती तशीच ठेवण्यासाठी किंबहुना कमी करण्‍यासाठी अभियान प्रयत्न करेल. आर्थिक घडी परत बसविण्यासाठी अनलॉक आवश्यक आहे. मात्र,  अनलॉक ५.० नंतर विविध ठिकाणी होणारी लोकांची गर्दी, सणासुदीमुळे वावर वाढणार त्यामुळे नव्या दमाने लोकांशी संवाद साधला जाईल. लोकांच्या पुढाकारातून ६ प्रमुख विषयांवर फोकस्ड उपक्रम आणि संदेश दिले जातील. प्रशासनासोबत व्यावसायिक संघटना, संस्था, लोकप्रतिनिधी, सीएसआर, सामान्य नागरिक स्वतः पुढे येतील, यासाठी प्रयत्‍न केले जातील.  लोकसहभागातून तयार झालेले संवाद साहित्य (आयइसी मटेरियल ) मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोचेल.

            अभियानाचे प्रमुख विषय –  आम्ही सावध आहोत. कोरोना अजून गेलेला नाही. आम्हाला कोरोना टाळायचा आहे. आम्ही नेहमी आणि योग्य प्रकारे मास्क घालू, इतरांनाही सांगू. कोरोनाची लागण झाल्यावर आम्ही घरी विलग राहू. सर्व काळजी घेऊन बरे होऊ, घरच्यांना सुरक्षित ठेवू. आम्ही गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळणार. आम्हाला कोरोनाचा संसर्ग नकोय. मी वयस्कर आहे. बीपी/शुगर/दमा आहे. मी घराबाहेर पडणार नाही आणि विशेष काळजी घेणार. कोरोनाची लक्षणं दिसली तर आम्ही लगेच तपासणी आणि उपचार घेणार.

            अभियानाचे स्वरुप- १४  ते २५ ऑक्टोबरच्या दरम्यान पुढील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम घेण्‍यात येणार आहेत.  बाजारपेठा आणि व्यावसायिक क्षेत्र (मार्केट यार्ड, मंडई, दुकाने, पथारीवाले), हॉटेल, बार, हातगाडीवरील अन्न विक्रेते, चौपाट्या, शहरी वस्ती, निवासी सोसायटी, कॉलनी, सार्वजनिक वाहतूक – सरकारी बस सेवा, रिक्षा कॅब, अति जोखमीचे गट- कचरा वेचक, घरेलू कामगार, हमाल, पथारीवाले, वयस्क व्यक्ती इत्यादी.

            हे अभियान जनरल प्रॅक्टिशनर व मनोविकारतज्ज्ञ यांच्‍याकडून विलगीकरण आणि पोस्ट कोविड सेवा देण्यासाठी दुवा ठरणार आहे.  पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा व पुणे ग्रामीण या क्षेत्रात राबवले जाईल. ही अभियानाची केवळ सुरुवात असेल. यानंतरही ३ ते ६ महिने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अभियान काम करत राहील, असे माजी आरोग्‍य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले. अभियानाच्‍या अंमलबजावणीसाठी सफाई कामगार, माथाडी कामगार संघटना, हमाल पंचायत, बाजार-मंडई अधिकारी, व्‍यापारी संघटना, बार असोसिएशन, वॉर्ड अधिकारी, कर्मचारी, घरकामगार संघटना, स्‍वच्‍छ, प्रवासी संघ, हॉटेल व्‍यावसायिक संघटना, तरुणांचे गट, वेटर्स, बँक कर्मचारी, रिक्षा पंचायत, वाहतूकदार संघटना, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल), परिवहन कार्यालय, जनसंघटना, स्‍त्रीसंघटना, वस्‍तीत काम करणा ऱ्या संस्‍था, सायकियाट्रिस्‍ट असोसिएशन समुपदेशक गट, दिव्‍यांग आयुक्‍तालय पालकगट, हाऊसिंग फेडरेशन यांची मदत घेण्‍यात येणार आहे. मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे आणि सुरक्षित अंतर राखणे याबाबत लोकांमध्‍ये जागृती करण्‍यासाठी हे अभियान पोषक ठरेल, असा विश्‍वास आहे.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

9423245456/ 9309854982

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...