- लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्यावतीने पुण्यातील १० चौकांमध्ये एकाच वेळी नो हॉंकिंग डे निमित्त हॉन एक दिवस बंद ठेवण्याबाबत जनजागृतीचे आयोजन
पुणे : नका वाजवू जोरात हॉर्न… आपली तब्येत राहिल छान, हॉर्न नॉट ओके प्लीज…एक, दोन, तीन, चार नो हॉर्न बार बार…ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका… अशा घोषणा देत पुणेकरांनी नो हॉंकिंग डे अर्थात नो हॉर्न डे एकाच वेळी १० चौकांमध्ये राबविला. टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सहभाग घेत पुणेकरांनो हॉर्न वाजवू नका, असे सांगण्यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले.
लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने नो हाँकीग डे अर्थात पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना राबविता जनजागृती आली. पुण्यातील १० चौकांमध्ये एकाच वेळी नो हाँकींग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम झाला. यावेळी पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, विश्रामबाग पोलीस स्टेशन वाहतूक विभागाचे चंदनशिव, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक, साई पॅकेंजिंगचे शंतनु प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुल श्रीरामे म्हणाले, पुण्यामध्ये वाहतूक नियोजन करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. तब्बल ४ हजार वाहनांच्या मागे १ कर्मचारी अशी सध्या संख्या आहे. पुणे शहरात ९८० कर्मचारी ४६ लाख वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन करीत आहेत. लोकसंख्येपेक्षा जास्त वाहने असलेले पुणे हे एकमेव शहर आहे. एक वाहन दिवसातून ५ ते १० वेळा हॉर्न वाजविते. त्यामुळे दिवसभरात १ कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजविला जातो. ध्वनीप्रदूषणाची समस्या देखील महत्वाची असून त्यावर वेळेत उपाययोजना करायला हवी.
मकरंद टिल्लू म्हणाले, वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळून आपल्या कृतीने इतरांची वृत्ती बदलण्याचा आपण प्रयत्न करुया.
देवेंद्र पाठक म्हणाले, पुण्यात ९० टक्के वेळा जे हॉर्न वाजविले जातात, हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिक मध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना ब-याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोथरुड, विश्रांतवाडी, पाषाण, बाणेर आणि जंगली महाराज रस्ता येथे एकाच वेळी जनजागृती करण्यात आली. मी स्वत: गेले अनेक महिने हॉर्न न वाजविता वाहन चालवित आहे. हॉर्न न वाजविता वाहन चालविणे शक्य असून तसा प्रयत्न आपण करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पद्माकर पुंडे यांनी केले.

