पुणे -मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद पाळला आहे. छत्रपती उदयनराजे भोसले,दीपक मानकर, आबा बागुल ,अरविंद शिंदे ,दत्ता सागरे आदी मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ केला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.बंदला अनेक सामाजिक, व्यापारी संघटनांचा पाठिंबा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मिळाला आहे. फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (एफएटीपी) चे अध्यक्ष एफ एम रांका म्हणाले , “आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि व्यापाऱ्यांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.सर्व दुकाने आणि कार्यालये दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहतील.

मोर्च्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाल महाल याठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे. विविध संघटनांनी आजच्या पुणे बंदला पाठिंबाही दिला आहे. यावेळी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे ,शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे ,प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे ,विकास पासलकर ,मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले

मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या दिसून आली आहे. राज्यपाल कोशियारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी काळीपट्टी दंडाला बांधत निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्र असलेला झेंडा आणि भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाल्याने भगवामय वातावरण पाहवयास मिळाले. सदर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी निषेध मोर्चा सुरू झालेल्या डेक्कन परिसर ते लाल महाल या दरम्यान चोख बंदोबस्त तैनात केला.
लक्ष्मी रोडची दुकाने बंद
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य नंतर पुण्यातील विविध पक्षांनी आज बंदचे आयोजन केले होते. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी सकाळी नेहमी गजबजलेल्या पुण्यातील लक्ष्मी रोड, तुळशीबाग परिसरातील दुकाने बंद असल्याची पाहावयास मिळाली. त्याचप्रमाणे बंदच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहतूकही काहीशी कमी झाल्याचे यावेळी दिसून आले. रिक्षा ही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

