पुणे-केंद्र सरकारने ‘जीएसटी’ लागू केला असला तरी त्यात सर्वसामान्य नागरिक होरपळत आहेत. जीएसटीच्या नावाखाली होणारी लूट म्हणजे एक प्रकारचा कर दहशतवाद आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी टीका केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते.
ते म्हणाले, बिस्किट, चॉकलेटसाठी वेगवेगळा कर, हे काय आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. भाजपला शह देण्यासाठी २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या भारत-चीन सीमाप्रश्न गंभीर झाला असून त्यावर अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंड उघडावे. सरकारने चीन प्रश्नावर आपली भुमिका जाहिर केल्यावर आम्ही बोलू. मात्र, हे सरकार काहीच करताना दिसत नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली.
चिंदबरम म्हणाले, भारत-पाक सीमेवर जवानावर प्रत्येक दिवशी हल्ले होत आहेत. त्यावर या सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मात्र, तेथील परिस्थिती सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे तरुणाई हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरली आहे. हे कशाचे लक्षण आहे, असा सवाल उपस्थित करून त्यांच्याशी सरकारने संवाद साधून परिस्थिती नियत्रंणात आणण्याची गरज व्यक्त केली. मात्र, या सरकारकडून काहीही होताना दिसत नसून आमच्या युपीए सरकारच्या काळात कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. तसेच युपीएच्या काळात झुंडशाहीतून बळी गेल्याची एकही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरमध्ये जोपर्यंत भाजप आणि पीडीपी हे युतीत आहेत, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही. अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावर निशाना साधला.