४ जानेवारी २०१९ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पुरस्कार सोहळा
पुणे-कला संस्कृती परिवार दरवर्षी देशातील एकमेक असा सोहळा साजरा करते ज्यामध्ये पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ यांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. तसेच यावेळी पडद्यामागील कलावंतासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या एका कलावंतास ‘कला कृतज्ञता’ पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा ‘कला कृतज्ञता’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कला संस्कृती परिवाराचे अध्यक्ष वैभव जोशी आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कला संस्कृती परिवाराचे उपाध्यक्ष माधव अभ्यंकर, मंगेश नगरे, सचिव विनय जवळगीकर, खजिनदार प्रवीण वानखेडे, संजय ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते. मेघराज भोसले म्हणाले, पुरस्काराचे यंदा चौथे वर्षे आहे. या वर्षीच्या ‘कला कृतज्ञता’ पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना गौरविण्यात येणार आहे, . तसेच मराठी चित्रपटाला सतत नि:स्वार्थ भावनेने मदत करणारे किशोर पंडित (कॅमेरा सप्लायर), बाळासाहेब शिंदे (होर्डिंग्ज) आणि शुभांगी दामले (महाराष्ट्र कल्चरल सेंटर) यांना ‘निकोप सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर उल्हासदादा पवार (कलाअभ्यासक व कलावंतांचे सन्मित्र) यांना ‘समाज संस्कृती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ निर्माते चारुकाका सरपोतदार, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी, अभिनेते जॅकी श्रॉफ यांना प्रदान करण्यात आला आहे
वैभव जोशी म्हणाले, चित्रपटाच्या पडद्यामागील तंत्रज्ञ आणि कलावंतांचा सन्मान आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कलासंस्कृती परिवार प्रयत्नशील आहे. कलासंस्कृती परिवार गेली ५ वर्षे अनेक पडद्यामागील गरजू कलावंताला दरमहा १००० रुपये आर्थिक सहाय्य या स्वरूपात देत आहे. या पुरस्कार सोहळ्यात स्पॉट बॉय, सेटिंग बॉय, लाईट बॉय, ड्रेस मन, हेअर ड्रेसर, आर्टिस्ट कॉर्डीनेटर, प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन असिस्टंट, पी.आर., कॅमेरा असिस्टंट आदींचा सन्मान सपत्नीक करण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येतात आणि एक समिती या पुरस्कारार्थीची निवड करते, तर आर्टिस्ट कॉर्डीनेटरसाठीच्या पुरस्कारार्थीची निवड पुरस्कार सोहळ्यात प्रत्यक्ष मतदानाद्वारे होते. या पडद्यामागील कलाकारांना स्मृतिचिन्ह आणि दोन लाख रुपयांचा फॅमिली मेडिक्लेम विमा देण्यात येतो. अभिनेते जॅकी श्रॉफ हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जॅकी श्रॉफ व रामदास फुटाणे कलासंस्कृती परिवाराचे मुख्य मार्गदर्शक आहेत. हा पुरस्कार सोहळा ४ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५ ते ८ वा. दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह पार पडणार आहे असेही त्यांनी सांगितले.