पुणे : घाबरायला मी काय ब्राम्हण आहे काय ? अशा वक्तव्याचा फटका आता मंत्रिमंडळाच्या फेरबदल -विस्तारात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना बसेल आणि त्यांच्या ऐवजी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान उद्या होणाऱ्या बैठकीसाठी आज सायंकाळी पालकमंत्री गिरीश बापट मुंबईला रवाना होत असून याप्रकरणी त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे .पुण्याच्या राजकीय दृष्टीकोनातून मुख्यमंत्री ,पालकमंत्री आणि महापौर अशी तिन्ही महत्वाची पदे ब्राम्हण समाजाकडे आहेत, कांबळे यांना डच्चू दिला तर मागासवर्गीय समाजावर त्याचा काही परिणाम होईल काय ,याची चाचपणी करणे गरजेचे आहे काय ? या प्रश्नावरही खल होतो आहे .
पुण्यातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकते आणि आमदार गिरीश बापट व दिलीप कांबळे यांच्याकडे मंत्रिपदे आहेत.शहराला आताच 2 मंत्री आहेत .हडपसर कचरा डेपो प्रकरणी , आणि येवलेवाडी विकास आराखड्याप्रकरणी टिळेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे . तर कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी देखील ते विशेष मेहनत घेत आहेत .तर दुसरीकडे गेल्या मार्च महिन्यात लातूर येथे दिलीप कांबळे यांनी केलेले वक्तव्य भाजपमधील काही मंडळींनी बरेच मनावर घेतलेले दिसते आहे . या पार्श्वभूमीवर कांबळे यांना आता मंत्रीपदावरून मुक्त केले जाईल असे काहींचे मत आहे . तर टिळेकर यांच्या मंत्रीपदाची चर्चा व्हाटसएप वरून रंगते आहे .पिंपरीतून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि आता भाजपचे लक्ष्मण जगताप व महेश लांडगे हे देखील ताकद मिळावी म्हणून मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत. नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्याचे फडणवीस यांनी ठरविले असले तरी विद्यमान मंत्रिमंडळातील कोणाला डच्चू देणार ?यावर बरीच समीकरणे असल्याचे बोलले जाते .यापूर्वी पुण्यातून प्रकाश ढेरे , रमेश बागवे,वसंत चव्हाण दिलीप कांबळे , बाळासाहेब शिवरकर , चंद्रकांत छाजेड ,शशिकांत सुतार यांनी पुणे शहरातून राज्यमंत्री म्हणून काम केले आहे . मात्र त्यांना पाच वर्षे मंत्रीपदावर राहू देण्यात आले नही .. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळात असलेले गिरीश बापट आणि दिलीप कांबळे यांना सलग पाच वर्षे मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.