पुणे-शनवार वाड्यावर राजकीय कार्यक्रम नाही , अशी भूमिका घेत ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला शनवार वाडा देता येणार नाही या दृष्टीने महापालिकेत हालचालींना प्रारंभ झाला असून माजी नगरसेवक आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी आज या कर्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द करा अशी मागणी करणारे पत्र महापलिका आयुक्त आणि महापौर यांना दिले आहे . तर महापौर मुक्ता टिळक यांनी शनवार वाड्यावर केवळ सांकृतिक कार्यक्रम होतील, राजकीय कार्यक्रम ,भाषणे यांना परवानगी देवू नका असे आदेश प्रशासनाला दिले आहेत .
काल संभाजी ब्रिगेड आणि अन्य काही संघटनांनी पत्रकार परिषद घेवून ३१ डिसेंबर रोजी शनवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती दिली होती .हि परिषद भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान म्हणून घेण्यात येणार आणि या परिषदेत नव्या पेशवाई विरोधातला सांस्कृतिक एल्गार म्हणून समर गाणी तसेच पहिल्या सत्रात राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचे ,गुजरात चे आमदार जिग्नेश मेवानी , जेएन यू चे उमर खालीद ,भिम आर्मीचे विनय रतन सिंग आणि हैद्राबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असोसिएशन चे प्रशांत दोन्था या वक्त्यांची भाषणे होतील तर पुढील सत्रात भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर ,माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील,तसेच साव्हारा आंदोलनाच्या उल्का महाजन ,आदिवासी महिला नेत्या सोनी सोरी आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लाॅ बोर्डाचे मौलाना अब्दुल हमीद अजहरी या वक्त्यांची भाषणे होतील असे पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले होते .
आज याबाबतच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर . याला समस्त हिंदू आघाडीकडून विरोध दर्शविण्यात आला असून हा कार्यक्रम राजकीय आहे. असा आक्षेप घेत शनवार वाड्यावर या साठी परवानगी दिली असल्यास ती तातडीने रद्द करा अशी मागणी महापालिकेकडे केली तर प्रसंगी याबाबत आपण पोलिसांकडे देखील अशा कार्यक्रमास परवानगी देवू नका अशी मागणी करू असे सांगितले.
यावर महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,ऐका संस्थेकडून सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेची परवानगी घेण्यात आली आहे.येथे सांस्कृतिक कार्यक्रम करता येईल मात्र राजकीय कार्यक्रम अथवा राजकीय भाषणे करता येणार नाही हा कार्यक्रम जर राजकीय असल्यास नियमाप्रमाणे परवानगी देणे शक्य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम नियमानुसार नसल्यास त्यांची परवानगी नाकारण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.